Jagannath Rath Yatra Stampede
Edited Image
Jagannath Rath Yatra Stampede: ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. रविवारी पहाटे 4:30 वाजता, श्री गुंडीचा मंदिरासमोर भाविक मोठ्या संख्येने भगवान दर्शनासाठी जमले होते, त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 50 जण जखमी झाले. घटनेबद्दल अधिक माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी शेकडो भाविक मंदिराजवळ जमले होते.
पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ एस स्वैन यांनी सांगितले की, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख बोलागड येथील बसंती साहू आणि बालीपटना येथील प्रेमकांत मोहंती आणि प्रवती दास अशी झाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा -उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; चारधाम यात्रा 24 तासांसाठी स्थगित
प्राप्त माहितीनुसार, चेंगराचेंगरीची ही घटना श्री गुंडीचा मंदिरासमोरील शारदाबलीजवळ घडली. रथावर बसलेले भगवान जगन्नाथ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. दर्शनाच्या वेळी गर्दी नियंत्रित करणे कठीण झाले आणि लोकांनी धक्काबुक्की सुरू केली. काही लोक जमिनीवर पडले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेने तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याशी साधला संवाद; भारतीय अंतराळविराला दिला 'हा' गृहपाठ
जगन्नाथ रथयात्रा -
दरम्यान, जगन्नाथ रथयात्रा ही देशातील सर्वात मोठ्या धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दर्शनासाठी पुरी येथे येतात. रथयात्रेदरम्यान, भगवानांना श्रीमंदिरातून बाहेर काढून श्री गुंडीचा मंदिरात नेले जाते. जिथे ते काही दिवस विश्रांती घेतात.