हरियाणा राज्य पोलीस दलामध्ये शनिवारी रात्री उशिरा मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, राज्य सरकारने 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण 35 पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या नव्या आदेशानुसार अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात व पदांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून, त्यांना राज्यातील विविध महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये व विभागांमध्ये नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या अचानक झालेल्या प्रशासकीय बदलांमुळे पोलीस वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, वरिष्ठ पातळीवर नवीन कामकाज सुरू झाले आहे.
महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये, याआधी हरियाणा राज्य अंमलबजावणी ब्युरोचे महासंचालक आणि दक्षता व सुरक्षा विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी नवदीप सिंग विर्क यांची आता हरियाणा मानवाधिकार आयोगाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी माता रवी किरण यांची हरियाणा राज्य अंमलबजावणी ब्युरोच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली असून, त्यांच्याकडे दक्षता आणि सुरक्षा संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपवण्यात आला आहे.
बी. सतीश बालन यांच्याकडे रेल्वे आणि कमांडो विभागाची जबाबदारी
या प्रशासकीय फेरबदलांतर्गत इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी विशेष कृती दलाचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी बी. सतीश बालन यांची आता रेल्वे आणि कमांडो पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तसेच, मनीष चौधरी यांची पंचकुला येथील राज्य दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे कारागृह विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदाचा अतिरीक्त कार्यभारही देण्यात आला आहे.
दुसरीकडे, सिमरदीप सिंग यांची भोंडसी येथील विशेष कृती दलाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे झज्जरचे पोलीस आयुक्त आणि भोंडसी येथील इंडिया रिझर्व्ह बटालियनचे (IRB) पोलिस महानिरीक्षक पदांची अतिरिक्त जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. पदोन्नतीनंतर हमीद अख्तर यांची रोहतक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर व विविध शाखांमध्ये नवीन चेहऱ्यांकडे सूत्रे
राज्यभरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा आणि शाखा स्तरावरही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सुमित कुमार यांची मानेसर येथील चौथ्या आयआरबी बटालियनच्या अतिरिक्त कमांडंटपदी नियुक्ती करण्यात आली असून ते सध्याच्या कर्तव्यांव्यतिरिक्त ही जबाबदारी पाहणार आहेत. विक्रांत भूषण यांची सोनीपत येथील गोहाना येथे पोलिस उपआयुक्त (DCP) म्हणून, तर जितेंद्र गेहलावत यांची सोनीपत गुन्हे शाखेत पोलिस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हितेश यादव यांची गुरुग्राममध्ये वाहतूक पोलिस उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, धीरज कुमार यांची पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे हरियाणा लोकायुक्त, पोलिस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.