Monday, March 09, 2026 08:58:08 AM

AI Generated Petitions : सर्वोच्च न्यायालय संतापले! बनावट AI निकाल वकिलांकडून सादर; अस्तित्वात नसलेल्या खटल्याचा दिला दाखला

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे मानवी कामे सोपी होतील असा दावा केला जात असला तरी, न्यायव्यवस्थेत मात्र या तंत्रज्ञानाने गंभीर पेच निर्माण केला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालय वकिलांवर संतापले आहे.

ai generated petitions  सर्वोच्च न्यायालय संतापले बनावट ai निकाल वकिलांकडून सादर अस्तित्वात नसलेल्या खटल्याचा दिला दाखला

AI generated petitions Supreme Court : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे मानवी कामे सोपी होतील असा दावा केला जात असला तरी, न्यायव्यवस्थेत मात्र या तंत्रज्ञानाने गंभीर पेच निर्माण केला आहे. सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी एआयच्या मदतीने तयार केलेल्या याचिकांमध्ये चक्क बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या निकालांचे संदर्भ दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना कडक शब्दांत फटकारले आहे.

काय घडले मंगळवारच्या सुनावणीत?
फेब्रुवारी 2026 मधील एका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना, चॅटजीपीटी (ChatGPT) किंवा तत्सम एआय टूल्सचा वापर करून काही याचिका तयार केल्याचे निदर्शनास आले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. याचिकांमध्ये अशा निकालांचे दाखले देण्यात आले होते, जे निकाल सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्षात कधी दिलेच नव्हते. सरन्यायाधीश म्हणाले, "वकिलांनी एआयचा वापर करून कायदेशीर मसुदा (Drafting) तयार करणे आणि चुकीचे संदर्भ देणे हे न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत चिंताजनक आहे."

जस्टिस नागरत्ना यांचा धक्कादायक अनुभव
खंडपीठातील सदस्य जस्टिस बी.व्ही. नागरत्ना यांनी एक धक्कादायक उदाहरण दिले. त्यांना एका प्रकरणात 'मर्सी व्हर्सेस मॅनकाइंड' (Mercy vs Mankind) या केसचा संदर्भ मिळाला. जेव्हा त्यांनी या केसची पडताळणी केली, तेव्हा अशी कोणतीही केस कायदेशीर इतिहासात अस्तित्वात नसल्याचे समोर आले. एआय टूल्स अनेकदा केसचे नाव बरोबर देतात, पण त्यातील मजकूर किंवा 'कोट' पूर्णपणे बनावट तयार करतात. यामुळे न्यायाधीशांच्या कामाचा ताण वाढत असून त्यांना प्रत्येक कागदपत्राची सत्यता पुन्हा तपासावी लागत आहे.

हेही वाचा - Newborn Baby Theft: अवघ्या 12 तासांत 'मिशन रेस्क्यू' फत्ते; रुग्णालयातून चोरी झालेले बाळ पोलिसांनी सुखरूप परत मिळवून दिले

कायदेशीर मसुदा कलेचा ऱ्हास
जस्टिस जॉयमाल्या बागची यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, सध्या 'लीगल ड्राफ्टिंग'च्या कलेचा ऱ्हास होत आहे. जुन्या काळातील अशोक कुमार सेन यांच्यासारख्या दिग्गज वकिलांचे मसुदे मोजके आणि अचूक असायचे. केवळ याचिका मोठी दिसावी यासाठी एआयच्या मदतीने जुन्या निकालांचे चुकीचे आणि बनावट दाखले भरणे हे कायदेशीर प्रक्रियेसाठी घातक आहे. काही महिन्यांपूर्वी एका उमेदवाराने एआयच्या मदतीने वकिलीची परीक्षा पास केल्याच्या बातम्या आल्या होत्या; मात्र, प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये हे तंत्रज्ञान धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

हायकोर्टाचा दणका आणि सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
अशाच एका प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने काही काळापूर्वी एआयद्वारे तयार केलेले बनावट दाखले वापरल्याबद्दल एका याचिकाकर्त्यावर मोठा दंड ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आता संपूर्ण देशातील वकिलांना एआयचा वापर करताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर केवळ मदतीसाठी असावा, मूळ बुद्धिमत्तेची जागा घेण्यासाठी नाही, असा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

तंत्रज्ञानाचा डोळे झाकून वापर धोकादायक
सध्या अनेकजण विविध कामांसाठी AI चा वापर करत आहेत. तर, काहींना काम झटपट उरकण्यासाठी AI चा आधार वाटत आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा डोळे झाकून वापर करणे अत्यंत धोकादायक आणि नवीन समस्यांना जन्म देणारे ठरू शकते. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कितीही वाढला तरी तो मानवी मेंदूला, कार्यक्षमतांना आणि कौशल्यांना पर्याय निर्माण करू शकत नाही, हेच सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे.

हेही वाचा - PM Internship Scheme: कॉर्पोरेट विश्वाशी जोडणारी 'PM इंटर्नशिप योजना'; 'या' कारणांमुळे केंद्र सरकारची वयोगट आणि नियमांमध्ये बदलाची तयारी


सम्बन्धित सामग्री