नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्यावरील वादग्रस्त विधानावरून फटकारले आहे. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार टिप्पण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला आहे. तथापि, न्यायालयाने राहुल गांधींनाही दिलासा दिला आणि त्यांच्याविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना कडक इशारा –
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सावरकर यांच्यावरील टिप्पण्णी प्रकरणी राहुल गांधींना कडक शब्दात फटकारले. न्यायालयाने म्हटलं की, इतिहास समजून घेतल्याशिवाय तुम्ही अशी विधाने करू शकत नाही. जर भविष्यात अशा प्रकारच्या टिप्पण्या पुन्हा केल्या गेल्या तर सर्वोच्च न्यायालय स्वतःहून दखल घेईल आणि सुनावणी घेईल. तथापि, न्यायालयाने पुढे उपहासात्मकपणे म्हटले, 'ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले त्यांच्याबद्दल तुम्ही असे कसे म्हणू शकता? उद्या तुम्ही महात्मा गांधींबद्दलही काहीतरी बोलाल कारण त्यांनी सावरकरांना 'विश्वासू सेवक' म्हटले होते?'
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटलं की, महात्मा गांधींनी सावरकरांचा आदर केला होता आणि राहुल गांधींच्या आजी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही त्यांना एक पत्र लिहिले होते. याशिवाय, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना सल्ला दिला की, 'तुम्ही महाराष्ट्रात गेल्यानंतर अशी विधाने करत आहात, जिथे वीर सावरकरांची पूजा केली जाते. तुम्ही असे करू नये. तुम्ही अशा टिप्पण्या का करत आहात?'
हेही वाचा – सोनिया आणि राहुल गांधींविरुद्ध ED ची मोठी कारवाई! नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र दाखल
सावरकरांविषयी राहुल गांधी काय म्हणाले होते?
हे प्रकरण 2022 मध्ये 'भारत जोडो यात्रे' दरम्यान महाराष्ट्रात राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहे. सावरकरांवर भाष्य करताना राहुल यांनी म्हटले होते की, ते इंग्रजांकडून पेन्शन घेत असतं. या विधानानंतर वकील नृपेंद्र पांडे यांनी लखनौच्या कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने प्रथमदर्शनी राहुल गांधींविरुद्ध आयपीसीच्या कलम 153 (अ) आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच राहुल गांधींना समन्स बजावले होते. राहुल गांधींनी या समन्सला आव्हान दिले आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून कडक निर्देश –
तथापि, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना भविष्यात अशा बेजबाबदार भाष्य टाळण्याचे कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाचा हा निर्णय राहुल गांधींसाठी धडाच आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे वक्तव्य करणाऱ्या खपवून घेतले जाणार नाही, असा संदेशही आहे.