TVK Congress alliance Tamil Nadu : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून अभिनेता विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने 108 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. मात्र, विधानसभेत बहुमतासाठी 118 या जादूई आकड्याची गरज असून विजय यांचा पक्ष अजूनही 10 जागांनी मागे आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये भाजपने इतिहास रचला असून केरळमध्ये काँग्रेस आघाडीने सत्ता मिळवली आहे. तामिळनाडूतील या त्रिशंकू अवस्थेत आता विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसला थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर देऊन राजकीय खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसने आपला इतिहास आणि वारसा जपण्यासाठी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काय आहे तामिळनाडूचे संभाव्य गणित?
बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांना मित्रपक्षांची जोड मिळवणे अनिवार्य आहे. सध्याचे संख्याबळ पाहता सत्ता समीकरणाचे चित्र खालीलप्रमाणे असू शकते:
- टीव्हीके (TVK): 108 जागा (सर्वात मोठा पक्ष)
- काँग्रेस (INC): 5 जागा
- डीएमके (DMK): 59 जागा
- इतर (PMK, IUML): अनुक्रमे 4 आणि 2 जागा
जर काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिला, तर हे संख्याबळ 113 पर्यंत पोहोचते. त्यानंतर बहुमतासाठी लागणाऱ्या उर्वरित 5 जागांसाठी 4 आमदार असलेल्या पीएमके (PMK) आणि 2 आमदार असलेल्या आययूएल (IUML) सारख्या लहान पक्षांची मदत घेता येईल.
हेही वाचा - Kalpita Majhi: बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर! धुणी-भांडी करणाऱ्या कल्पिता माझी बनल्या आमदार; जाणून घ्या त्यांच्या संघर्षाची कहाणी
काँग्रेससमोरील 'धर्मसंकट' आणि मोठी संधी
तामिळनाडूमध्ये काँग्रेस गेली अनेक वर्षे द्रमुक (DMK) सोबत 'इंडिया' आघाडीत आहे, मात्र स्टॅलिन यांच्या सरकारमध्ये काँग्रेसचा एकही मंत्री नव्हता. विजय यांच्या वडिलांच्या ऑफरमुळे काँग्रेसला आता थेट सत्तेत वाटा मिळण्याची आणि राज्यात पक्ष मजबूत करण्याची मोठी संधी चालून आली आहे. चंद्रशेखर यांच्या मते, सत्तेच्या अभावामुळे काँग्रेस कमकुवत होत चालली असून, दुसऱ्यांना पाठिंबा देण्यापेक्षा स्वतः सत्तेत सहभागी होणे पक्षासाठी 'संजीवनी' ठरू शकते. आता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे स्टॅलिन यांच्याशी असलेला आघाडी धर्म पाळणार की सत्तेसाठी विजय यांचा हात धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजयाची रणनीती आणि द्रमुकचा विरोध
निवडणुकीच्या प्रचारात थलापती विजय यांनी सत्ताधारी द्रमुक आणि स्टॅलिन यांच्या विरोधात जोरदार रान उठवले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर विजय द्रमुकसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता धूसर आहे. विजय यांच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, काँग्रेसला सत्तेत वाटा देऊन त्यांचा गौरव परत मिळवून देण्यास विजय तयार आहे. तामिळनाडूच्या राजकारणात हा नवीन प्रयोग यशस्वी झाल्यास, दक्षिणेतील राजकारणाला एक वेगळी दिशा मिळू शकते.
हेही वाचा - West Bengal CM Oath Ceremony: पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, 'या' दिवशी पार पडणार मुख्यमंत्री शपथविधी सोहळा