Agni-3 Missile : भारताने आपल्या संरक्षण क्षमतेत मोलाची भर घालत 'अग्नि-3' या इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) वरून हे प्रक्षेपण करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली असून क्षेपणास्त्राने सर्व निर्धारित उद्दिष्टे अचूकपणे गाठली आहेत. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या (SFC) देखरेखीखाली पार पडलेली ही चाचणी क्षेपणास्त्राची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठीच्या नियमित सरावाचा एक भाग होती.
शत्रूसाठी कर्दनकाळ; काय आहे 'अग्नि-3'ची ताकद?
'अग्नि-3' हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्याची मारा करण्याची क्षमता साधारण 3,000 ते 3,500 किलोमीटर इतकी आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असून दोन टप्प्यातील घन इंधन तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामुळे ते प्रचंड वेगाने लक्ष्याचा वेध घेऊ शकते. डीआरडीओने (DRDO) विकसित केलेले हे क्षेपणास्त्र रस्ते आणि रेल्वे अशा दोन्ही ठिकाणांहून डागता येते, ज्यामुळे युद्धकाळात ते कुठेही तैनात करणे सोपे होते.
हेही वाचा - Indians In America: ट्रम्प यांचा भारतीयांना 'दे धक्का'; या' एका निर्णयाने अमेरिकेतून 3800 भारतीयांची हकालपट्टी
संरक्षण क्षेत्रातील भारताचे महत्त्वाचे पाऊल
भारताच्या क्षेपणास्त्र ताफ्यात अग्नी मालिकेतील विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेत. यामध्ये अग्नि-1 (लहान पल्ला), अग्नि-2 (मध्यम पल्ला) आणि प्रगत श्रेणीतील अग्नि-4 व अग्नि-5 यांचा समावेश होतो. या मालिकेत 'अग्नि-3' चे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, ही प्रणाली भारताच्या 'आण्विक प्रतिबंध' धोरणाचा (Nuclear Deterrence) एक कणा आहे. भारताचे हे सामर्थ्य केवळ युद्धासाठी नसून शांतता राखण्यासाठी आणि शत्रू राष्ट्रांना भारताच्या सुरक्षेबाबत कडक संदेश देण्यासाठी आहे.
भविष्यातील सज्जता आणि सुधारणा
या यशस्वी चाचणीमुळे भारताची धोरणात्मक संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत झाली आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये सतत नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करणे आणि त्यांची अचूकता वाढवणे हे भारताचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. येणाऱ्या काळात अशा आणखी चाचण्या घेऊन देशाच्या सीमा अधिक सुरक्षित केल्या जाणार आहेत. 'अग्नि-3' ची ही यशोगाथा भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.