Monday, March 09, 2026 08:14:25 AM

Flight Fare Hike : मध्यपूर्वेतील युद्धाचा प्रवाशांना मोठा फटका; लंडन-मुंबई विमान प्रवासासाठी मोजावे लागत आहेत 'इतके' पैसे

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे विमान कंपन्यांना आपला मार्ग बदलावा लागत आहे. लांबचा प्रवास आणि विमानांच्या कमतरतेमुळे तिकीट दरांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.

flight fare hike  मध्यपूर्वेतील युद्धाचा प्रवाशांना मोठा फटका लंडन-मुंबई विमान प्रवासासाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे

Flight Fare Hike : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता थेट विमान प्रवासावर उमटू लागले असून परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे विमान कंपन्यांना आपला मार्ग बदलावा लागत आहे. लांबचा प्रवास आणि विमानांच्या कमतरतेमुळे तिकीट दरांमध्ये विक्रमी वाढ झाली असून, लंडन ते मुंबई या थेट विमान प्रवासाचे भाडे चक्क 9 लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

विमानभाडे आकाशाला भिडले
सामान्यतः लंडन आणि मुंबई दरम्यान इकॉनॉमी क्लासचे भाडे 20,000 ते 40,000 रुपये आणि बिझनेस क्लासचे भाडे 1.2 लाख ते 2.5 लाख रुपयांच्या दरम्यान असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, इकॉनॉमी क्लासचे तिकीट आता 2.9 लाख रुपयांवर पोहोचले आहे, तर बिझनेस क्लाससाठी प्रवाशांना 9 लाख रुपये मोजावे लागत आहेत. या अवाढव्य भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

उड्डाणे रद्द झाल्याने संकट गडद
केवळ लांबचा मार्गच नाही, तर मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द होणे हे देखील भाडेवाढीचे मुख्य कारण ठरले आहे. सोमवारी जगभरात जवळपास 700 उड्डाणे रद्द करण्यात आली. भारतातही याचे पडसाद उमटले असून बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली विमानतळांवरून 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानांची संख्या घटल्याने आणि प्रवाशांची मागणी वाढल्याने उपलब्ध तिकिटांच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.

हेही वाचा - US Warn Citizens : काहीतरी भयंकर होण्याच्या वाटेवर? अमेरिकेने जारी केला हाय अलर्ट, नागरिकांना लवकरात लवकर देश सोडण्याचे आदेश...

प्रवाशांसाठी महत्त्वाचा सल्ला
विमान वाहतुकीतील हा विस्कळीतपणा आणि महागडे भाडे पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. विमानतळावर जाण्यापूर्वी किंवा तिकीट बुक करण्यापूर्वी संबंधित एअरलाईन्सच्या वेबसाईटवर जाऊन उड्डाणांची ताजी स्थिती तपासणे शहाणपणाचे ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या