Sunday, July 13, 2025 09:40:48 AM

विजय रुपाणीसह भारतातील 'या' मोठ्या व्यक्तींनी गमावला आहे विमान अपघातात आपला जीव

विजय रुपानी हे विमान अपघातात जीव गमावणारे पहिले राजकीय नेते नाहीत. त्यांच्या आधी भारतातील अनेक मोठ्या व्यक्तींचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

विजय रुपाणीसह भारतातील या मोठ्या व्यक्तींनी गमावला आहे विमान अपघातात आपला जीव
Edited Image

नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एअर इंडियाच्या ड्रिमलाइनर विमानाचा अपघात झाला. या अपघातात केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला. या विमानातील 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबादमधील या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचेही निधन झाले. तथापि, विजय रुपानी हे विमान अपघातात जीव गमावणारे पहिले राजकीय नेते नाहीत. त्यांच्या आधी भारतातील अनेक मोठ्या व्यक्तींचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. विमान अपघातात आपला जीव गमवणाऱ्या या व्यक्ती नेमक्या कोण आहेत? ते जाणून घेऊयात. 
 
होमी जहांगीर भाभा - 

भारतातील आघाडीचे अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचे 24 जानेवारी 1966 रोजी एअर इंडिया फ्लाइट 101 च्या अपघातात निधन झाले. जिनेव्हा हवाई वाहतूक नियंत्रणाशी चुकीच्या संपर्कामुळे विमान स्विस आल्प्समध्ये कोसळले.

संजय गांधी 

काँग्रेस नेते संजय गांधी यांचे 23 जून 1980 रोजी विमान अपघातात निधन झाले. संजय सफदरजंग विमानतळाजवळ दिल्ली फ्लाइंग क्लब विमान उडवत होते. विमानप्रदर्शन करताना त्यांचे विमानावरील नियंत्रण सुटले. विमान कोसळल्याने संजय गांधी यांना आपला जीव गमवावा लागला. 

माधव राव सिंधिया

ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी विमान अपघातात निधन झाले. ते दहा आसनी खाजगी विमानातून कानपूरला जात होते, जे उत्तर प्रदेशातील मैनपुरीजवळ खराब हवामानामुळे कोसळले. 

सायप्रियन संगमा

दरम्यान, मेघालयाचे ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन संगमा आणि इतर नऊ जण 22 सप्टेंबर 2004 रोजी पवन हंस हेलिकॉप्टरने गुवाहाटीहून शिलॉंगला जात असताना, त्यांचे हेलिकॉप्टर राज्याच्या राजधानीपासून फक्त 20 किमी अंतरावर असलेल्या बारापाणी तलावाजवळ कोसळले. या हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - भरल्या ताटावर विद्यार्थ्यांना आलं मरण! मेसमधील धक्कादायक व्हिडिओ आला समोर

ओपी जिंदाल आणि सुरेंदर सिंग 

हरियाणा मंत्री ओम प्रकाश जिंदाल आणि कृषी मंत्री सुरेंदर सिंग यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. 2005 मध्ये हा अपघात झाला होता. त्यांचे हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे कोसळले.

हेही वाचा - ड्रीमलायनर विमानात किती आपत्कालीन एक्झिट असतात? एकमेव प्रवाशाचे कसे वाचले प्राण?

वाय एस रेड्डी

तथापी, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. हा अपघात 2009 मध्ये घडला होता. 

बिपिन रावत 

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. हा अपघात 8 डिसेंबर 2021 रोजी घडला होता. 
 


सम्बन्धित सामग्री