Cough Syrup Controversy: देशभरात खळबळ उडवणाऱ्या विषारी कफ सिरप 'कोल्ड्रिफ' प्रकरणावरून केंद्र आणि तामिळनाडू सरकारमध्ये जबाबदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात किमान 20 बालमृत्यू झाल्याचे समोर आले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले की हा दोषारोपाचा खेळ नसून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय सूत्रांच्या माहितीनुसार, तामिळनाडू अन्न व औषध प्रशासनाने (TN-FDA) केंद्रीय एजन्सींच्या शिफारसी असूनही कोणतीही फौजदारी कारवाई केली नाही. 'हा केंद्र आणि राज्यातील संघर्ष नाही. पण प्रश्न असा आहे की, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने स्पष्ट सूचना दिल्यानंतरही TN-FDA ने परवाना रद्द का केला नाही आणि गुन्हे दाखल का केले नाहीत?' असा सवाल आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
तपास अहवालात गंभीर उल्लंघने
तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल विभागाच्या 26 पानांच्या अहवालात, कोल्ड्रिफ सिरप बनवणाऱ्या स्रेसन फार्मास्युटिकल्स या कंपनीत 350 हून अधिक नियमभंग आढळले. अहवालात नमूद केल्याप्रमाणे याठिकाणी अस्वच्छ उत्पादन परिस्थिती, गंजलेली आणि अप्रमाणित उपकरणे, नॉन-फार्मा-ग्रेड रसायनांचा वापर आढळला. या सर्व गंभीर त्रुटींमुळे सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल सारखे विषारी घटक आढळले असल्याचे नमूद करण्यात आले.
हेही वाचा - IPS Puran Kumar Suicide : काय आहे IPS पूरन कुमार यांच्या सुइसाईड नोटमध्ये? पत्नीही आहे वरिष्ठ IAS अधिकारी
दरम्यान, तामिळनाडूचे आरोग्यमंत्री मा. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, 'राज्याने 1 ऑक्टोबरपासूनच विक्रीवर बंदी घातली आणि 3 ऑक्टोबरला उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले. सिंधुवाडा (मध्य प्रदेश) येथे बालमृत्यूची बातमी आल्यानंतर आम्ही तातडीने कारवाई केली. आमच्या राज्यात हे सिरप विकले गेले नाही. 7 ऑक्टोबर रोजी फौजदारी कारवाईसाठी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.'
हेही वाचा - Cough Syrup Ban: सरकारच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष; 2 वर्षांपूर्वी बंदी घातलेल्या कफ सिरप फॉर्म्युलामुळे 16 हून अधिक चिमुरड्यांचा मृत्यू
बनावट औषधांवरील राज्यस्तरीय कारवाई
तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल आयुक्तांनी सांगितले की, राज्यातील 290 बनावट औषध प्रकरणांची तपासणी पुढील 15 दिवसांत पूर्ण केली जाईल. दरम्यान, एका अधिकाऱ्याला तपास फायली लपवल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. तो अधिकारी तपास अहवाल स्वतःजवळ ठेवत होता. प्रथमदर्शनी हे जाणूनबुजून केल्याचे दिसते, असे त्यांनी सांगितले. कोल्ड्रिफ सिरपमुळे भारतीय औषध उद्योगाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.