लखनौ : उत्तर प्रदेशातील फतेहाबाद येथील एका टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस कमी मिळाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला. याच संतापातून त्यांनी टोल प्लाझाचे गेट उघडं ठेवले, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील फतेहाबाद येथे ही घटना घडली. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी व्यवस्थापनाकडे दिवाळी बोनसची मागणी केली असता, व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना वाढली आणि त्यांनी थेट टोल प्लाझाचे गेट उघडण्याचा निर्णय घेतला.
या सर्व प्रकारामुळे जवळपास दोन तास टोल वसुली पूर्णपणे थांबली. या काळात हजारो वाहने टोल टॅक्स न भरताच पुढे निघून गेली. या गोंधळामुळे टोल कंपनीचे तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. सुरुवातीला टोल प्लाझा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, पोलिसांनाही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांपुढे काही करता आले नाही. अखेरीस, व्यवस्थापन आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तोडगा काढण्यात आला.
हेही वाचा - Tata Trust: टाटा ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय : वेणू श्रीनिवासन यांची आजीवन नियुक्ती; विश्वस्तांमधील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न
कर्मचाऱ्यांचा नेमका आरोप काय?
फतेहाबादमधील या टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांचा मुख्य आरोप हा होता की, कंपनीने दिवाळीला प्रत्येक कर्मचाऱ्याला खूप कमी बोनस दिला. कंपनीने यावेळी केवळ 1,100 रुपये बोनस दिला, तर मागील वर्षी 5,000 रुपये बोनस दिला होता. त्यामुळे यावर्षीही मागच्या वर्षाप्रमाणे बोनस मिळावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती.
अखेरीस, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दोन तास समजावून सांगितले आणि त्यांना 10 टक्के पगारवाढ देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आणि टोल प्लाझावर पुन्हा काम सुरू केले. दरम्यान, या सर्व गोंधळात तब्बल पाच हजारपेक्षा जास्त वाहने टोल न भरताच निघून गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा - Govardhan Asrani Death: ही होती असरानी यांची शेवटची इच्छा; मृत्यूपूर्वीच पत्नीला दिल्या होत्या या खास सूचना...