Ahmedabad Plane Crash: गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताबाबत एका इटालियन वृत्तपत्राने केलेल्या खळबळजनक दाव्यांचे केंद्र सरकारने जोरदार खंडन केले आहे. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नसून वैमानिकाने जाणूनबुजून इंधन स्विच (Fuel Switch) बंद केल्यामुळे झाला, असा दावा परदेशी माध्यमांनी केला होता. मात्र, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत तपास अजूनही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
परदेशी माध्यमांचा वैमानिकावर ठपका, बोईंगला क्लीन चिट?
इटालियन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, अपघाताचा सर्व दोष वैमानिक सुमित सभरवाल यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ज्या Boeing कंपनीच्या विमानांवर जगभरात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, त्या कंपनीला या वृत्ताद्वारे क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला. 'आपण आपल्या देशातील तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायचा की बाहेरील लोकांच्या अनुमानांवर?' असा सवाल मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.
'अंतिम अहवालापूर्वी भाष्य करणे चुकीचे': मुरलीधर मोहोळ
शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की, तपास अद्याप प्राथमिक आणि तांत्रिक टप्प्यावर आहे. ते म्हणाले, 'आमच्या एजन्सी या प्रकरणावर सखोल काम करत आहेत. तपास पूर्ण होऊन अंतिम अहवाल प्रसिद्ध होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे किंवा त्यावर भाष्य करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल.' परदेशी माध्यमांनी दिलेले वृत्त हे केवळ दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी सूचित केले.
AAIB कडून स्पष्टीकरण: मीडिया रिपोर्ट्स केवळ तर्कवितर्क
विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने देखील गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. AAIB नुसार, तपास अद्याप सुरू असून कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. मीडियामध्ये फिरणारे अहवाल हे 'चुकीचे आणि केवळ अनुमानांवर आधारित' आहेत. अहमदाबाद अपघातानंतर जागतिक स्तरावर अनेक बोईंग विमानांच्या स्विचमध्ये बिघाड आढळून आल्याने तांत्रिक बाजूकडे अधिक लक्ष दिले जात आहे.
हेही वाचा - Tamil Brahmi inscriptions: पिरॅमिडचा देश इजिप्तमध्ये सापडले 2,000 वर्षे जुने तमिळ शिलालेख; अत्यंत विस्मयकारक ऐतिहासिक पुरावा
260 जणांचा बळी घेणारी ती भीषण दुर्घटना
12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडन गॅटविकला उड्डाण केल्यानंतर लगेचच एअर इंडियाचे बोईंग 787-8 विमान कोसळले होते. या हृदयद्रावक अपघातात 241 प्रवाशांसह एकूण 260 लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती आणि तेव्हापासून या विमानांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.