Tuesday, November 11, 2025 11:21:11 PM

Australian Women Cricketers Molested: इंदूरमध्ये दोन महिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसोबत गैरवर्तन! आरोपीला अटक

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना एका तरुणाने त्रास दिल्याची आणि एका खेळाडूचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

australian women cricketers molested इंदूरमध्ये दोन महिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसोबत गैरवर्तन आरोपीला अटक

Australian Women Cricketers Molested: भारतामध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंदूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना एका तरुणाने त्रास दिल्याची आणि एका खेळाडूचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

खजराना रोड परिसरात प्रकार

ही घटना गुरुवारी (23 ऑक्टोबर) सकाळी खजराना रोड परिसरात घडली. दोन्ही खेळाडू हॉटेलमधून एका कॅफेकडे निघाल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या अकील खान नावाच्या तरुणाने त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने एका खेळाडूसोबत अयोग्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

सुरक्षा अधिकाऱ्यांची तत्परता

घटनेनंतर, घाबरलेल्या खेळाडूंनी लगेचच संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्याशी संपर्क साधला. तसेच स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलाला याबाबत त्वरित माहिती देण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त हिमानी मिश्रा यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून चौकशी केली आणि दोन्ही खेळाडूंचे जबाब नोंदवले. एमआयजी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 74 आणि 78 (पाठलाग आणि विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - Asia Cup Trophy Missing: आशिया कप ट्रॉफी प्रकरणात नवा ट्विस्ट! ACC मुख्यालयातून आशिया कप ट्रॉफी गायब

नागरिकाच्या सतर्कतेमुळे मिळाली आरोपीची माहिती

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका नागरिकाने आरोपीच्या बाईकचा नंबर नोंदवून पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी अकील खानला अटक केली. तपासात समोर आले की, आरोपीवर यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणे नोंद आहेत. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

हेही वाचा ICC fines Afghanistan : अफगाणिस्तानला दुहेरी धक्का! झिम्बाब्वेकडून पराभवानंतर ICC कडून दंड

इंदूरमधील सुरक्षेवर प्रश्न

या घटनेमुळे इंदूरमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयसीसी विश्वचषकाचे सामने सुरू असताना आणि परदेशी खेळाडू शहरात असताना असा प्रकार घडल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या प्रतिमेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सामन्यापूर्वी तणावाचे वातावरण

दरम्यान, 25 ऑक्टोबर रोजी इंदूरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वीच्या या घटनेमुळे आयोजक आणि सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. पोलिसांनी शहरातील हॉटेल्स, मैदान आणि प्रमुख मार्गांवर सुरक्षा वाढवली असून, सर्व संघांच्या हालचालींवर अधिक देखरेख ठेवली जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री