Ujjain Shahi Masjid: मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा 2028’ च्या पूर्वतयारीसाठी हाती घेण्यात आलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला हिंसक वळण मिळाले आहे. अब्दालपुरा भागातील ऐतिहासिक ‘शाही मशिदीचा’ बाधित भाग हटवण्याच्या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला. रविवारी (27 सप्टेंबर 2026) रात्री पोकलेन मशीन्ससह प्रशासनाचे पथक पोहोचताच जमावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सोमवारी सकाळी या तणावाचे रुपांतर संघर्षात झाले असून, संतापलेल्या जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना पांगवले.
500 मीटरचा परिसर सील; 2,000 पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त
हिंसाचार भडकू नये यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलत संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप दिले आहे. शाही मशिदीच्या सभोवतालचा 500 मीटरचा परिसर पूर्णपणे बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला असून, सर्व प्रकारची वाहतूक रोखण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घटनास्थळी सुमारे 2,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनात महिलांची संख्याही मोठी असून, मशिदीचा भाग पाडण्याच्या कारवाईविरोधात स्थानिक मुस्लिम समाजात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! बँक कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठा निर्णय! रात्री उशिरा संघटनांची बैठक; अखेर काय ठरलं?
मुस्लिम समाजात दोन गट; 900 मीटरच्या रस्त्यावर 7 धार्मिक स्थळे बाधित
सिंहस्थ आयोजनाचा भाग म्हणून कांतल चौक ते गोपाल मंदिरादरम्यानचा 900 मीटर लांबीचा मार्ग 15 मीटरने रुंद केला जात आहे. या प्रकल्पात एकूण 7 धार्मिक स्थळे बाधित होत असून, त्यातील बहुतांश स्थळे परस्पर संमतीने हटवण्यात आली आहेत. मात्र, खादी हनुमान मंदिर आणि शाही मशिदीबाबत पेच निर्माण झाला आहे. या कारवाईवरून मुस्लिम समाजातही दोन स्पष्ट गट पडले आहेत; एक गट विकासासाठी संपूर्ण मशीद पुनर्रचित करण्यास तयार आहे, तर दुसरा गट प्रशासकीय कारवाईला कडाडून विरोध करत आहे.
उच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; कायदेशीर लढाई सुरू
रस्त्यावर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. रस्ता रुंदीकरणात शाही मशिदीचे नुकसान होऊ नये यासाठी मुस्लिम समाजाच्या एका प्रतिनिधी मंडळाने इंदूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्व प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले असून, परिसरात अजूनही तणावपूर्ण शांतता कायम आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.