PM Modi Birthday Sand Art: ओडिशातील प्रसिद्ध पुरी समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक अद्वितीय आणि नयनरम्य वाळूशिल्प (Sand Art) साकारण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी 25 फूट लांबीची ही भव्य वाळूची कलाकृती तयार केली असून, यात 2,500 मातीचे दिवे (पणत्या) लावण्यात आले होते. ‘लॅम्प ऑफ ब्लेसिंग्स – 25 इयर्स ऑफ सर्व्हिस – हॅपी बर्थडे मोदी जी’ असे नाव देण्यात आलेली ही कलाकृती पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या अखंड राष्ट्रसेवेला आणि जनसेवेला समर्पित करण्यात आली आहे.
तिरंग्याची पार्श्वभूमी अन् ‘नमस्कार’ मुद्रा; 2,500 दिव्यांचा लखलखाट
सुदर्शन पटनायक यांनी या कलाकृतीचा व्हिडिओ आपल्या ‘@sudarsansand’ या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून शेअर केला आहे. या वाळूशिल्पात राष्ट्रध्वज तिरंग्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना ‘नमस्कार’ मुद्रेत दाखवण्यात आले आहे. मुख्य आकृतीभोवती पारंपरिक नक्षीकाम आणि शुभेच्छांचे संदेश रेखाटण्यात आले आहेत. यामध्ये वापरण्यात आलेली 25 फुटांची लांबी ही 25 वर्षांच्या सेवेचे प्रतीक आहे, तर 2,500 प्रज्वलित दिवे हे देशभरातील जनतेचे आशीर्वाद, प्रकाश आणि दीर्घायुष्यासाठी केलेल्या प्रार्थनांचे प्रतिनिधित्व करतात. सुदर्शन पटनायक यांनी भगवान जगन्नाथाच्या चरणी प्रार्थना करत पंतप्रधान मोदींना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
‘सँड-आर्ट ॲनिमेशन’ द्वारे विद्यार्थ्यांनीही दिल्या शुभेच्छा
सुदर्शन पटनायक यांनी ‘X’ वर आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ‘सुदर्शन सँड आर्ट इन्स्टिट्यूट’च्या विद्यार्थिनी मोनालिसा मोहराना आणि सोनाली अलुक यांनी तयार केलेले विशेष ‘सँड-आर्ट ॲनिमेशन’ पाहायला मिळत आहे. या दोन्ही प्रतिभावान विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या आहेत.
On the occasion of the birthday of Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji. ? My special sand art at Puri Beach in Odisha, adorned with 2,500 diyas, carries the message: “Aashirwad Ka Diya – 25 Years of Seva – Happy Birthday Modi Ji.” This heartfelt creation conveys my… pic.twitter.com/xJoplBfXjN — Sudarsan Pattnaik (@sudarsansand) September 17, 2026
पुरी बीचवर पर्यटकांची गर्दी; ‘आशीर्वाद का दिया’ मोहिमेला पाठिंबा
संध्याकाळच्या वेळी जेव्हा हे 2,500 दिवे प्रज्वलित करण्यात आले, तेव्हा पुरी बीचवरील हे दृश्य अत्यंत मनमोहक दिसत होते. ही कलाकृती पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. हे वाळूशिल्प ‘आशीर्वाद का दिया’ या देशव्यापी मोहिमेचा एक भाग आहे, ज्याअंतर्गत नागरिक आपापल्या घरी दिवे लावून पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान मोदींनीही जनतेच्या या भावनांचे कौतुक करत, प्रत्येक आशीर्वाद देशाच्या विकासाचा संकल्प अधिक दृढ करतो असे म्हटले आहे. पुरी बीचवरील ही कलाकृती कला आणि निष्ठेचा एक सुंदर संगम ठरली आहे.