Unique Holi Celebration in India : होळी आणि रंगपंचमीचा सण म्हणजे केवळ रंगांची उधळण नसून ती मनांमधील दरी मिटवण्याची एक संधी असते. यावर्षी 3 मार्च 2026 रोजी धूलिवंदन दिवशी देशात अनेक ठिकाणी रंगांची उधळण केली जाते. जेव्हा आपण या सणाचा विचार करतो, तेव्हा डोळ्यांसमोर मथुरा-वृंदावनची होळी येते. मात्र, भारताच्या विविध प्रांतात हा सण साजरा करण्याच्या अतिशय अनोख्या आणि आश्चर्यकारक पद्धती आहेत.
बरसानाची प्रसिद्ध 'लाठमार' होळी
उत्तर प्रदेशातील बरसाना येथील रंगपंचमी जगभरात 'लाठमार होळी' म्हणून प्रसिद्ध आहे. ही परंपरा राधा-कृष्णाच्या प्रेमलीलांशी जोडलेली आहे. यात महिला प्रतीकात्मकपणे लाठ्यांनी पुरुषांवर वार करतात, तर पुरुष ढालींच्या साहाय्याने स्वतःचे रक्षण करतात. भक्ती आणि उत्साहाचे हे अनोखे मिश्रण पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे हजेरी लावतात.
वाराणसीचे आध्यात्मिक रंग
काशी (वाराणसी) मध्ये रंगपंचमी ही अध्यात्म आणि मौजमजेचा संगम असते. गंगेच्या घाटांवर गुलाल, संगीत आणि थंडाईची रेलचेल असते. ढोल-ताशांच्या गजरात शिवभक्त मोठ्या उत्साहात रंगात न्हाऊन निघतात.
हेही वाचा - Holi Colours Removal Tips: आता खेळा बिंधास्त! होळीचे हट्टी रंग निघत नाहीत? 'या' 5 घरगुती टिप्स करतील कमाल
शांतिनिकेतनचा वसंतोत्सव, पश्चिम बंगाल
दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या परंपरेनुसार 'वसंतोत्सव' साजरा होतो. येथे विद्यार्थी पिवळे वस्त्र परिधान करून नृत्य, गायन आणि कलेच्या माध्यमातून अतिशय शांत व सात्विक पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे वसंत ऋतू आणि रंगपंचमीचे स्वागत करतात.
उदयपूरची राजेशाही आणि प्रयागराजची 'कपडा फाड' होळी
उदयपूर: राजस्थानमधील उदयपूरची रंगपंचमी राजेशाही थाटासाठी ओळखली जाते. मेवाड राजघराण्याच्या परंपरेनुसार येथे भव्य मिरवणुका काढल्या जातात. सजवलेले हत्ती, घोडे आणि पारंपरिक लोकनृत्य यामुळे हा उत्सव अत्यंत वैभवशाली वाटतो.
प्रयागराज: प्रयागराजमध्ये (अलाहाबाद) रंगपंचमी साजरी करण्याची पद्धत अत्यंत रांगडी आहे. येथे 'कपडा फाड' होळी अत्यंत लोकप्रिय आहे. यात पुरुष एकत्रितपणे होळी खेळताना एकमेकांचे कपडे फाडतात. संगीताच्या तालावर चालणारा हा सामूहिक उत्सव येथील आकर्षणाचे केंद्र असतो.
सांस्कृतिक विविधतेचे दर्शन
भारतातील या विविध पद्धतींमधून देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. मथुरा-वृंदावनच्या कुंजगल्लींपासून ते शांतिनिकेतनच्या शांत परिसरापर्यंत, प्रत्येक ठिकाणची रंगपंचमी आपल्याला एक वेगळा अनुभव देते. या सणामुळे जुने हेवेदावे विसरून नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होण्यास मदत होते.
हेही वाचा - No Holi in these Countries : इथे होळी अन् रंगांना बंदी! 'या' देशांत धुळवड खेळल्यास थेट तुरुंगवास; चाबकाचे फटकेही बसू शकतात, वाचा कठोर नियम