Tuesday, November 18, 2025 09:38:21 PM

तरुणांची अरेरावी, वाहतूक पोलिसाला मारहाण करत फाडला गणवेश, व्हिडीओ व्हायरल

रस्त्याच्या चुकीच्या बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारमधील काही तरुणांनी कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली.

तरुणांची अरेरावी वाहतूक पोलिसाला मारहाण करत फाडला गणवेश व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. रस्त्याच्या चुकीच्या बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारमधील काही तरुणांनी कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना शहरातील कोतवाली परिसरात घडली.

दरम्यान पोलिसाचा गणवेश फाडला गेला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी संपूर्ण घटना त्यांच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल केली. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस जमीन अली रविवारी संध्याकाळी नोबेलिटी चौकात वाहतूक नियंत्रित करत असताना त्यांनी चुकीच्या बाजूने येणारी एर्टिगा कार थांबवली. यानंतर कारमधील लोक संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसाला शिवीगाळ केली. तसेच वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच घटनास्थळी गोंधळ उडाला आणि गर्दी जमली.

हेही वाचा: Navi Mumbai: धक्कादायक! जन्मदात्या आईनेचं दहा वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायात ढकललं
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक बबलू कुमार वर्मा त्यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत आरोपी गाडी लॉक करून पळून गेले होते. धक्कादायक म्हणजे, गाडीत चार वर्षांची मुलगी झोपली होती. परिस्थिती पाहून पोलिसांनी तात्काळ गाडीची खिडकी तोडली आणि मुलीला सुरक्षितपणे बाहेर काढले. वेळीच कारवाई केली नसती तर मुलीचा जीव धोक्यात आला असता.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी एर्टिगा कार जप्त केली आहे. पोलिसांनी फरार आरोपींविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. या संदर्भात एसपी सिटी सत्यनारायण प्रजापत म्हणाले, "नोबेलिटी चौकात वाहतूक पोलिसांनी चुकीच्या बाजूने जाणारे एक वाहन थांबवले. यानंतर गाडीतील तरुणांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आणि मारहाण केली. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे आणि कडक फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल."

 

 


सम्बन्धित सामग्री