नवी दिल्ली: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याचे इंस्टाग्राम अकाउंट 29 जानेवारीच्या रात्री अचानक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गायब झाल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. 27 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेले हे अकाउंट सध्या ना सर्चमध्ये दिसत आहे, ना प्रोफाइल उघडत आहे. त्यामुळे कोहलीने स्वतः अकाउंट डिलीट केले की ते तात्पुरते सस्पेंड किंवा डीॲक्टिव्हेट झाले, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी चिंता व्यक्त करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेक फॅन्सनी थेट विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिला टॅग करत प्रश्न विचारले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर विराट कोहली, त्याची मॅनेजमेंट टीम किंवा इंस्टाग्रामकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.
अलीकडच्या काळात विराट कोहली सोशल मीडियावर तुलनेने कमी सक्रिय दिसत होता. काही काळापूर्वी त्याने अनेक प्रमोशनल पोस्ट हटवून क्रिकेट आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे कोहलीने जाणीवपूर्वक सोशल मीडियापासून थोडे अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला असावा, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. काही मीडिया अहवालांनुसार, विराट एका इंस्टाग्राम प्रमोशनसाठी 12 ते 14 कोटी रुपये इतके मानधन घेतो.
हेही वाचा: Pune Bogus Doctor : रुग्णांची मोठी फसवणूक ! पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश
विराट कोहलीची सोशल मीडिया लोकप्रियता प्रचंड आहे. जागतिक स्तरावर तो क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसीनंतर सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या क्रीडापटूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर नेमार ज्युनियरचा क्रमांक लागतो. त्यामुळे इतक्या मोठ्या स्टारचे अकाउंट अचानक गायब होणे, ही बाब साहजिकच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीचे योगदान अतुलनीय राहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण 85 शतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 123 सामन्यांत 9230 धावा, वनडेमध्ये 311 सामन्यांत 14797 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4188 धावा त्याने केल्या आहेत. त्याने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून सध्या तो केवळ वनडे फॉर्मेटमध्ये खेळताना दिसतो आहे.
दरम्यान, विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट नेमके कोणत्या कारणामुळे गायब झाले, याबाबत अधिकृत माहिती येईपर्यंत चाहत्यांची उत्सुकता आणि चिंता कायम राहणार आहे. आता विराटच्या अधिकृत स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा: Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत? महाराष्ट्राच्या आर्थिक शिस्तीवर केंद्राचा थेट प्रहार