महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना काल उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे संध्याकाळननंतर देखील काही प्रमाणात उष्णतेची झळ नागरिकांना बसत होती.
त्यातच मान्सून परतीच्या वाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे तुरळक सरी बरसण्याच्या शक्यता जवळजवळ नाहीशा होताना दिसत आहेत. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज संध्याकाळच्या सुमारास गारवा असण्याची शक्यता वर्तवली जातेय.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासह देशभरातील मोठ्या भागांतून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीच्या प्रवासाकरिता वेग धरला आहे. देशातील उत्तर भागांसह राज्यातील निम्म्या भागांत या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गैरहजेरी दर्शवली आहे. त्याचा परिणाम म्हणून उकाडा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय.
यंदा 19 सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली होती. त्यानंतर 23 सप्टेंबरपर्यंत देशाच्या वायव्य भागातील बहुतांश परिसरातून मान्सूनने माघार घेतली. आता परतीच्या प्रवासाने वेग घेतला असून उत्तर भारतातील उर्वरित भागासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागांतूनही मान्सून परतला आहे.
पुढील काही दिवसांत मान्सून अजून माघारी जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकातील काही भागांतूनही मान्सून परतण्याची शक्यता वर्तवली जातेय.
त्यामुळे सध्यातरी ऑक्टोबर हिटचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने काळजी घेण्याचे व नियमित पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.