वडोदरा: वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL 2026) चौथ्या मोसमात शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सविरुद्ध विजयासाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या गुजरात जायंट्सने अखेर पराभवाचा 'वनवास' संपवला आहे. स्पर्धेतील 19 व्या सामन्यात गुजरातने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर 11 धावांनी थरारक मात केली. विशेष म्हणजे, डब्ल्यूपीएलच्या इतिहासात तब्बल आठवेळा मुंबईकडून पराभूत झाल्यानंतर गुजरातने मिळवलेला हा पहिलावहिला विजय ठरला असून, या विजयासोबतच त्यांनी थेट 'प्लेऑफ'मध्ये धडक मारली आहे.
बडोद्यातील कोतांबी येथील बीसीए स्टेडियमवर रंगलेला हा सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' अशाच स्वरूपाचा होता. गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुंबईच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, तरीही त्यांनी 20 षटकांत चार गड्यांच्या बदल्यात 167 धावांपर्यंत पोहचले. फलंदाजांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली, जी नंतर मुंबईसाठी 'लोढणे' ठरली.
हेही वाचा: Sunetra Pawar : दादांच्या निधनानंतर आईला सावरलं, जय-पार्थ भावंडांचा खंबीर पाठिंबा; 'त्या' एका निर्णयामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं
168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अडखळत झाली. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरने मैदानावर बॅटने अक्षरशः वादळ निर्माण केले. 'एकीची झुंज' देत हरमनप्रीतने 48 चेंडूंत आठ चौकार आणि चार उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी साकारली. हरमनप्रीत एका बाजूने किल्ला लढवत असताना तिला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळू शकली नाही. सजीवन सजना (26) आणि एमेलिया केर (20) यांचा अपवाद वगळता मुंबईच्या इतर फलंदाजांनी गुजरातच्या फिरकीसमोर शरणागती पत्करली.
गुजरातच्या गोलंदाजांनी आज कात टाकल्याचे पाहायला मिळाले. एकूण सात गोलंदाजांचा वापर करत कर्णधाराने मुंबईच्या फलंदाजांना जखडून ठेवले. यामध्ये जॉर्जिया वारहॅम आणि सोफी डीव्हाईन या दोघींनी टिच्चून मारा करत प्रत्येकी दोन बळी मिळवले. मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्यामुळे मुंबईचा डाव 20 षटकांत सात बाद 156 धावांवर आटोपला. विजयासाठी अवघ्या 11 धावा कमी पडल्याने मुंबईला या पराभवासह गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे.
या विजयामुळे गुजरात जायंट्सने केवळ मागील पराभवांची परतफेड केली नाही, तर गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांपैकी पाच विजयांसह गुजरातच्या खात्यात 10 गुण जमा झाले आहेत. दुसरीकडे, साखळी फेरीतील शेवटचा सामना गमावल्यामुळे मुंबई इंडियन्सचा पुढील प्रवासाचा मार्ग आता इतरांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. गुजरातसाठी हा विजय म्हणजे त्यांच्या संयमाचे आणि सांघिक कामगिरीचे फळ ठरले आहे.
हेही वाचा: India's First Budget : स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प कोणी आणि कधी सादर केला?