वडोदरा: वुमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) यंदाच्या हंगामात विजयाचा अश्वमेध घेऊन वाटचाल करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अखेर पराभवाची चव चाखावी लागली आहे. शनिवारी वडोदऱ्याच्या मैदानावर पार पडलेल्या चुरशीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने बलाढ्य आरसीबीवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने केवळ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली नाही, तर बाद फेरीच्या शर्यतीत स्वतःचे स्थान अधिक भक्कम केले आहे.
सामन्याची सुरुवात दिल्लीच्या बाजूने झाली ती नाणेफेकीपासून. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि दिल्लीच्या गोलंदाजांनी तो सार्थ ठरवला. आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने एकाकी झुंज देत 34 चेंडूत 38 धावांची खेळी केली, मात्र तिला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. दिल्लीच्या नंदनी शर्माने 26 धावा देत 3 विकेट्स घेत धारदार गोलंदाजीने आरसीबीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्याने बंगळुरूचा डाव 20 षटकांत अवघ्या 109 धावांत आटोपला.
हेही वाचा: Crime News : माता न तू वैरिणी! डोक्यात पाटा घालत आईनेच संपवलं लेकीला...नालासोपाऱ्यातील घटनेने एकच खळबळ
110 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात काहीशी अडखळती झाली. अवघ्या 24 धावांवर दोन्ही सलामीवीर माघारी परतल्याने आरसीबीच्या गोटात विजयाची आशा निर्माण झाली होती. परंतु, संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ घालत लॉरा वोल्वार्ड (नाबाद 42) आणि कर्णधार जेमिमा रॉड्रिग्स (24) यांनी 52 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अखेर मारिझान कापच्या फटकेबाजीमुळे 15.4 षटकांतच दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्स अत्यंत आनंदी दिसली. तिने विजयाचे संपूर्ण श्रेय सांघिक कामगिरीला दिले. “आमच्या नियोजनाची शंभर टक्के अंमलबजावणी मैदानात झाली, त्यामुळे माझे काम सोपे झाले. स्मृती जोपर्यंत मैदानात होती, तोपर्यंत आमच्यावर दबाव होता, पण एका टप्प्यावर घेतलेला शानदार झेल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला,” असे जेमिमाने सामन्यानंतर नमूद केले. या विजयामुळे दिल्ली आता सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
गुणतालिकेवर नजर टाकली तर आरसीबी अद्याप 10 गुणांसह अव्वल स्थानावर असली, तरी या पराभवामुळे त्यांना थेट अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आता पुढील सामन्यांत अधिक कसरत करावी लागणार आहे. गुजरात जायंट्स सहा गुणांसह तिसऱ्या, तर मुंबई इंडियन्स चार गुणांसह चौथ्या स्थानावर असून हा संघ करो या मरोच्या स्थितीत आहेत. साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असल्याने प्रत्येक धाव आणि प्रत्येक गडी आता प्ले-ऑफचे समीकरण ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा: Malad Crime: दारातली धक्काबुक्की जीवावर बेतली, लोकलमधील किरकोळ वादातून तरुणाने थेट चाकूच काढला अन्...