Amazon AI Plan: तंत्रज्ञानाचा वेगाने वाढता प्रभाव आता थेट मानवी रोजगारांवर परिणाम करणार आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Amazon ने पुढील दशकात आपल्या अमेरिकेतील वेअरहाऊसेसमधून सुमारे 5 लाख नोकऱ्या रोबोट्सने बदलण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील लाखो कामगार आणि त्यांची कुटुंबे चिंतेत सापडली आहेत.
Amazon च्या मते, या उपक्रमामागे उद्देश आहे. खर्च नियंत्रण, कार्यक्षमतेत वाढ आणि तांत्रिक क्षेत्रातील नवीन भूमिका निर्माण करणे. पण याचबरोबर पारंपारिक वेअरहाऊस कामगारांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या कंपनीकडे सुमारे 12 लाख कर्मचारी आहेत, पण नवीन ऑटोमेशन प्लॅनमुळे 2027 पर्यंत 1.6 लाख नवीन भरती टाळता येणार आहे. कंपनीच्या अंतर्गत अहवालानुसार, प्रत्येक वस्तूची प्रक्रिया करण्याचा खर्च सुमारे 30 सेंट्सने कमी होईल. म्हणजेच, कार्यक्षमता वाढवतानाच आर्थिक फायदा देखील कंपनीच्या खिशात जाणार आहे.
हेही वाचा:AI Browser: AI ब्राउजरचा वापर करताना घ्या खबरदारी! तुमचा वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक
Amazon आपल्या अनेक वेअरहाऊसमध्ये “कोबॉट्स” (Collaborative Robots) वापरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे रोबोट्स वस्तू उचलणे, पॅक करणे आणि हलवण्याची कामे मानवी मदतीशिवाय करू शकतात. लुईझियाना आणि व्हर्जिनिया येथील काही वेअरहाऊसमध्ये ही चाचणी यशस्वी ठरली असून, कंपनी येत्या काही वर्षांत 40 पेक्षा जास्त ठिकाणी हे मॉडेल लागू करण्याची योजना आखत आहे.
कंपनीने या प्रक्रियेला 'AI' किंवा 'Automation' न म्हणता 'Advanced Technology' असे नाव दिले आहे, जेणेकरून जनतेत भीती निर्माण होऊ नये. परंतु तज्ज्ञांच्या मते, हा बदल ब्लू-कॉलर कामगार आणि अश्वेत समुदायांवर असमतोल परिणाम करू शकतो. कारण Amazon च्या वेअरहाऊसमध्ये याच गटातील लोक सर्वाधिक कार्यरत आहेत.
हेही वाचा:Elon Musk On Job Cuts: एलोन मस्क यांचे AI बद्दल मोठं भाकित! नोकर कपातीबद्दलही केलं धक्कादायक विधान
Amazon च्या मते, हा बदल केवळ नोकऱ्या कमी करण्यासाठी नसून, रोबोटिक्स तंत्रज्ञांसारख्या उच्च कौशल्याच्या पदांसाठी संधी निर्माण करण्यासाठी आहे. उदाहरणार्थ, सध्या रोबोटिक्स तंत्रज्ञ प्रति तास 24.45 डॉलर कमावतात, जे सामान्य वेअरहाऊस कामगारांच्या 19.50 डॉलर वेतनापेक्षा अधिक आहे. कंपनी मेकाट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी खास शिकाऊ कार्यक्रमही चालवत आहे.
तथापि, विश्लेषकांचे मत आहे की Amazon चा हा बदल ‘कार्यस्थळातील मानवी उपस्थिती कमी करण्याच्या दिशेने मोठं पाऊल’ आहे. एकीकडे कंपनी नवे तांत्रिक रोजगार तयार करत आहे, तर दुसरीकडे हजारो कुटुंबांचे आर्थिक स्थैर्य धोक्यात येऊ शकते.
Amazon आता एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर आहे. जिथे वेग, कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य मिळेल, पण त्याची किंमत मानवी रोजगार गमावूनच चुकवावी लागेल.