Bank Holiday September 2026: सप्टेंबर महिन्यात तुम्ही बँकेत जाऊन रोख व्यवहार किंवा चेक भरण्यासारखी महत्त्वाची कामे करण्याचे नियोजन करत असाल, तर ही कामे आधीच पूर्ण करून घेणे हिताचे ठरेल. सप्टेंबर महिन्यात संप आणि विविध सुट्ट्यांमुळे देशभरातील बँकिंग कामकाज एकूण 12 दिवस बंद राहणार आहे. सणासुदीचा काळ जवळ आलेला असताना सलग सुट्ट्या आणि कर्मचाऱ्यांचा संप यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांची मोठी धावपळ होण्याची चिन्हे आहेत.
संपामुळे 4 दिवस ठप्प राहणार काम; 'या' आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या
संपाचे दिवस: 11 सप्टेंबर रोजी 1 दिवसाचा देशव्यापी संप, तर 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी सलग 3 दिवस संप पुकारण्यात आला आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) ने आपल्या मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या संपामुळे महिन्यातून एकूण 4 दिवस बँकांचे काम पूर्णपणे ठप्प असेल.
प्रमुख मागण्या: भारतीय रिझर्व्ह बँक आणि विमा क्षेत्राप्रमाणे बँकांमध्येही आठवड्यातून 5 दिवस कामाची पद्धत लागू करावी. यासोबतच सर्व बँकांमध्ये परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह करार समान रीतीने लागू करण्यात यावेत, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
हेही वाचा – Jan Dhan Yojana : जन धन योजनेत महिलांचा डंका; 12 वर्षांत 32 कोटींहून अधिक खाती महिलांच्या नावावर
सण आणि साप्ताहिक मिळून 8 दिवस अधिकृत सुट्ट्या
संप व्यतिरिक्त सप्टेंबर महिन्यात सण-उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे एकूण 8 दिवस बँकांचे दरवाजे बंद राहतील.
सण आणि उत्सव: 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बहुतांश राज्यांमध्ये सुट्टी असेल, तर 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि हरतालिका या सणांमुळे बँका बंद राहतील.
साप्ताहिक सुट्ट्या: 6 सप्टेंबर (रविवार), 12 सप्टेंबर (दुसरा शनिवार), 13 सप्टेंबर (रविवार), 20 सप्टेंबर (रविवार), 26 सप्टेंबर (चौथा शनिवार) आणि 27 सप्टेंबर (रविवार) या 6 दिवशी बँकांना सुट्टी असेल
डिजिटल बँकिंग सेवा मात्र 24 तास सुरूच राहणार
सप्टेंबर महिन्यात तब्बल 12 दिवस बँकांच्या प्रत्यक्ष शाखांचे कामकाज ठप्प राहणार असल्याने रोख रक्कम काढणे, जमा करणे आणि प्रशासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, या काळातही ग्राहकांसाठी डिजिटल सुविधा अखंडित सुरू राहतील.
उपलब्ध सेवा: एटीएम (ATM), इंटरनेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंगद्वारे नागरिक आपले आर्थिक व्यवहार करू शकतील.