Jan Dhan Yojana : देशातील प्रत्येक नागरिकाला औपचारिक बँकिंग प्रक्रियेशी जोडण्याच्या ध्येयाने सुरू करण्यात आलेल्या 'पंतप्रधान जन धन योजने'ने (PMJDY) यशाची 12 वर्षे पूर्ण केली आहेत. 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे 59 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आपली बँक खाती उघडली आहेत. विशेष म्हणजे, केवळ खाती उघडण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता लोकांनी त्यात बचतीची सवयही जोपासली आहे. 19 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार, या जन धन खात्यांमधील एकूण ठेवींचा आकडा 3,16,513.80 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रत्येक खात्यामध्ये सरासरी 5,356 रुपये जमा असून, ग्रामीण आणि निम-शहरी भागांत तब्बल 45.95 कोटी खाती नोंदवली गेली आहेत.
महिला सबलीकरण आणि डिजिटल आर्थिक सुरक्षा
जन धन योजनेने देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. सध्या एकूण खात्यांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच 32.92 कोटी खाती महिलांच्या नावावर आहेत, ज्यामुळे महिलांचा बँकिंग क्षेत्रातील सहभाग कमालीचा वाढला आहे. याशिवाय, डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी खातेधारकांना आतापर्यंत 41.29 कोटी 'रुपे' (RuPay) डेबिट कार्ड्सचे वाटप करण्यात आले आहे. या कार्ड्ससोबतच खातेधारकांना मोफत अपघात विमा संरक्षण मिळतो, तसेच गरज पडल्यास 10,000 रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट (Overdraft) सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.
'जॅम' (JAM) त्रिमुती आणि थेट लाभ हस्तांतरण
जन धन, आधार आणि मोबाईल (JAM) या तिन्हींची सांगड घालून सरकारने देशातील कल्याणकारी योजनांचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. यामुळे सरकारी अनुदानाचा आणि मदतीचा पैसा मध्यस्थांशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होत आहे. या खात्यांमुळे सर्वसामान्यांना 'प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा' आणि 'सुरक्षा विमा' यांसारख्या अल्पदरातील विमा योजना तसेच पेन्शन सुविधांशी जोडणे सुलभ झाले आहे. याशिवाय, मजबूत बँकिंग इतिहास तयार झाल्यामुळे खातेधारकांना 'मुद्रा' योजनेसारख्या लघुउद्योगांसाठी सहज कर्ज मिळवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.