UPI Payment Rule: यंदा 1 ऑक्टोबरपासून दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या अनेक गोष्टींचे नियम बदलणार आहेत. हे बदल फक्त तांत्रिक किंवा कागदी नाहीत, तर त्यांचा थेट परिणाम घरगुती बजेट, खरेदी-विक्री, प्रवास, व्यवहार आणि अगदी मनोरंजनाच्या पद्धतींवर होणार आहे. रेल्वे प्रवासापासून पेन्शन गुंतवणुकीपर्यंत, डिजिटल पेमेंटपासून ऑनलाईन गेमिंगपर्यंत अनेक क्षेत्रात हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून सुरू होणारे नवे बदल काय आहेत, ते जाणून घेऊयात.
आतापर्यंत एजंट आणि दलाल IRCTC वरुन तिकीट बुकिंग करायचे. त्यावेळी काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक व्हायचे. यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते. परंतु आता 1 ऑक्टोबरपासून, IRCTC वरून तिकीट बुक करताना सुरूवातीचे 15 मिनिटे आता एजंट तिकीट बुक करू शकणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकिट मिळेल.
हेही वाचा: DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) मध्ये एक नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू केले जाईल. यामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग कामगार एकाच पॅन नंबरचा वापर करून अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडता येईल.
आता सर्वच जण यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करतात. आता, NPCI ने एक मोठा बदल केला आहे. 1 ऑक्टोबरपासून NPCI ने UPI चे 'रिक्वेस्ट फॉर मनी' फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या फीचरचा वापर कुणीही तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्यासाठी करू शकतो. यामुळे अनेकदा फसवणूक प्रकार झाला आहे. आता ते बंद झाल्यामुळे, डिजिटल व्यवहार आणखी सुरक्षित होतील.
ऑनलाईन गेमिंग क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण त्यासोबत फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. सरकारने मंजूर केलेले नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. त्यामुळे गेमिंग कंपन्यांवर सरकारकडून कडक नजर ठेवली जाणार आहे.