6G Internet: 5G तंत्रज्ञानाच्या यशस्वी सुरूवातीनंतर आता जगभरातील देशांनी पुढील पिढीचे इंटरनेट, म्हणजे 6G, विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारत आणि युएईमध्ये या नव्या नेटवर्कच्या चाचण्या जोरात सुरू आहेत, ज्या भविष्यातील इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
अलीकडे युएईने न्यू यॉर्क विद्यापीठाच्या सहकार्याने 6G चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली. या ट्रायलमध्ये मिळालेल्या स्पीडने तंत्रज्ञानाच्या क्षमता दाखवून दिल्या आहेत. 6G टेराहर्ट्झ पायलट प्रोजेक्टद्वारे मिळालेल्या डेटानुसार इंटरनेट स्पीड 145 Gbps पर्यंत नोंदवला गेला, जो सध्याच्या 5G नेटवर्कपेक्षा खूप जलद आहे. तुलना करता, 2024 मध्ये युएईमध्ये 5G नेटवर्कचा सरासरी डाउनलोड स्पीड 660.08 Mbps होता, तर भारतात एप्रिल ते जून 2025 दरम्यान सरासरी 136.53 Mbps रेकॉर्ड झाला. यामुळे 6G तंत्रज्ञानाचा भविष्यातील इंटरनेट अनुभव किती वेगवान आणि प्रभावी असणार आहे याची कल्पना येते.
हेही वाचा: AI Music Hits Artist Royalties : एआय म्युझिक बूममुळे कलाकारांच्या रॉयल्टीवर होऊ शकतो परिणाम; फिच रेटिंग्जचा इशारा
6G च्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये कमी विलंबता (low latency), अल्ट्रा-हाय-कॅपॅसिटी डेटा ट्रान्सफर आणि हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे. टेराहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा वापर करून उपग्रह, फायबर ऑप्टिक्स आणि हाय-उंचीचे प्लॅटफॉर्मवर प्रभावी नेटवर्क तयार करता येईल. यामुळे ग्रामीण, शहरी, समुद्रकिनारी आणि हवामानाच्या कठीण परिस्थितीतही उच्च दर्जाचे इंटरनेट उपलब्ध होईल.
भारतानेही 6G चाचणीसाठी महत्वाचे पाऊल टाकले आहे. IIT हैदराबादने विविध सरकारी संस्था आणि संशोधन विभागांच्या सहकार्याने 7 गीगाहर्ट्झवर 6G प्रोटोटाइप विकसित केला आणि त्याची यशस्वी चाचणी केली आहे. प्राध्यापक किरण कुची यांच्या म्हणण्यानुसार, 2030 पर्यंत भारतात 6G तंत्रज्ञान लागू होण्याची शक्यता आहे. या नव्या नेटवर्कमुळे देशभरातील नागरिकांना फक्त वेगवान इंटरनेटच नव्हे, तर स्मार्ट शहर, स्मार्ट गावे आणि डिजिटल सेवा यांचा अधिक प्रभावी लाभ मिळणार आहे.
हेही वाचा: Post Office Fast Delivery Service: आता तुमचं पार्सल फक्त 4 तासांत पोहोचणार; पोस्ट ऑफिसने सुरू केली नवीन जलद वितरण सेवा
6G नेटवर्क फक्त वेगाच्या बाबतीतच नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मोठा बदल घडवून आणेल. यामुळे टेलिकॉम उद्योग, शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, औद्योगिक क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडेल. तसेच, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल कनेक्टिव्हिटीची गुणवत्ता वाढेल.
संपूर्ण जगात 6G च्या ट्रायल्स सुरू आहेत आणि भारत या स्पर्धेत मागे राहणार नाही. 2030 पर्यंत भारतात हाय-स्पीड इंटरनेट पोहचल्यास शिक्षण, उद्योग आणि वैद्यकीय सेवा यांचा डिजिटल अनुभव अत्यंत सुलभ होईल. या नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट फक्त जलद होणार नाही तर सर्वत्र, प्रत्येकासाठी सहज उपलब्ध होईल.