Instagram TV App: मोबाइलवर सतत रील्स पाहण्यापेक्षा आता मोठ्या स्क्रीनवर हा अनुभव घेता येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने टीव्हीसाठी खास अॅप लॉन्च केलं असून, यामुळे वापरकर्त्यांना थेट टीव्हीवर रील्स पाहता येणार आहेत. शॉर्ट व्हिडीओ कंटेंटची वाढती लोकप्रियता लक्षात घेता इंस्टाग्रामने उचललेलं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.
ही नवी टीव्ही अॅप मोबाईल अॅपपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करते. टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांचा अनुभव लक्षात घेऊन अॅपची रचना करण्यात आली आहे. लॉग-इन केल्यानंतर युजर्सना म्युझिक, स्पोर्ट्स हायलाइट्स, ट्रॅव्हल, ट्रेंडिंग मोमेंट्स अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये रील्स पाहायला मिळतात. त्यामुळे आवडीचा कंटेंट शोधणं अधिक सोपं होणार आहे.
टीव्ही अॅपच्या होमस्क्रीनवर हॉरिजॉन्टल स्वरूपात व्हिडीओ थंबनेल्स दाखवले जातात. कोणत्याही थंबनेलवर क्लिक केल्यावर ती रील पूर्ण स्क्रीनवर कॅप्शनसह सुरू होते. मोबाईलप्रमाणेच पुढची रील पाहण्यासाठी स्वाइप करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईलवर मिळणारा अनुभव टीव्हीवरही तसाच जाणवतो.
हेही वाचा:Lenovo Idea Tab Plus भारतात लाँच; 12GB RAM, 5G सपोर्ट आणि Tab Pen सह दमदार टॅबलेट
या अॅपचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी पाच अकाउंट लॉग-इन करता येतात. कुटुंबीय किंवा मित्र एकत्र बसून वेगवेगळ्या अकाउंट्समधील रील्स पाहू शकतात. वापरकर्त्यांच्या फीडबॅकनुसार हे फीचर देण्यात आल्याचं इंस्टाग्रामने स्पष्ट केलं आहे. एकत्र बसून रील्स पाहण्याची सवय वाढत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
रील्स आधीच सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. आता त्या थेट टीव्हीवर उपलब्ध झाल्यामुळे यूट्यूबसारख्या व्हिडीओ प्लॅटफॉर्मसाठी ही स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मोठ्या स्क्रीनवर शॉर्ट व्हिडीओ पाहण्याचा ट्रेंड वाढल्यास डिजिटल मनोरंजनाचं चित्र बदलू शकतं.
हेही वाचा: e-SIM म्हणजे काय? जाणून घ्या, या आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटेही
सध्या ही टीव्ही अॅप अमेरिकेत अमेझॉन फायर टीव्ही डिव्हाइसेससाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली आहे. या टप्प्यावर वापरकर्त्यांचा फीडबॅक घेतला जात असून, त्यानंतर आवश्यक सुधारणा करून ही अॅप इतर देशांमध्ये आणि डिव्हाइसेससाठी हळूहळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. भारतात ही सुविधा येण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असं मानलं जात आहे.
मोबाईलपुरती मर्यादित असलेली रील्स आता टीव्हीवर येत असल्याने कंटेंट पाहण्याची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. भविष्यात शॉर्ट व्हिडीओ कंटेंटचा अनुभव मोठ्या स्क्रीनवर घेण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढेल, यात शंका नाही.