RBI Gold Reserves: भारतीय मध्यवर्ती बँकेच्या (आरबीआय) सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून सद्यस्थितीत रिझर्व्ह बँकेकडे तब्बल 880.52 मेट्रिक टन सोने पडून असल्याची अधिकृत माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली. राज्यसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही आकडेवारी जाहीर केली. मात्र, याच वेळी देशातील विविध धार्मिक संस्था आणि सामान्य कुटुंबांकडे एकूण किती सोने जमा आहे, याबाबतचा कोणताही अधिकृत अभ्यास किंवा माहिती उपलब्ध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.
सोन्याच्या राखीव साठ्यात सातत्याने वाढ
सरकारने मांडलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेचा सोन्याचा साठा वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहे. 31 मार्च 2024 रोजी आरबीआयकडे 822.10 मेट्रिक टन सोने होते, जे 31 मार्च 2025 पर्यंत वाढून 879.58 मेट्रिक टन झाले होते. यात आणखी भर पडत जून 2026 च्या अखेरपर्यंत हा साठा 880.52 मेट्रिक टनावर पोहोचला आहे. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी आरबीआयकडून ही खरेदी सातत्याने केली जात असल्याचे यावरून स्पष्ट होते.
देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
दुसरीकडे, भारतीय रुपया मजबूत झाल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीच्या संकेतांमुळे देशांतर्गत सर्राफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठा घसरण झाली आहे. दिल्लीतील बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर तब्बल 2,640 रुपयांनी घसरून 1,47,000 रुपयांवर आले आहेत, तर चांदीच्या दरात किलोमागे 5,200 रुपयांची मोठी कपात होऊन तो 2,24,800 रुपयांवर पोहोचला आहे. रुपयाच्या मजबुतीमुळे धातूंची आयात स्वस्त झाल्याचा फायदा स्थानिक बाजाराला मिळाला आहे.
जागतिक बाजारातील दबाव आणि गुंतवणूकदारांची सावध भूमिका
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या आगामी पतधोरण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, जागतिक पातळीवर सोन्याचे स्पॉट दर 53.50 डॉलरने घसरून 4,023.50 डॉलर प्रति औंसवर आले आहेत, तर चांदीचे दर 2 टक्क्यांनी घसरून 57.24 डॉलर प्रति औंस नोंदवले गेले. तसेच, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) ताज्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,291 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेटचा दर 1,30,339 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला आहे.