SBI YONO Whatsapp Scam Alert : भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) करोडो ग्राहकांना सध्या सायबर गुन्हेगारांनी आपले लक्ष्य बनवले आहे. विशेषतः जे ग्राहक 'योनो' (YONO) हे डिजिटल बँकिंग ॲप वापरतात, त्यांना व्हॉट्सॲपवर एक भीतीदायक संदेश पाठवला जात आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जातो की, तुमचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे तुमचे YONO ॲप तातडीने ब्लॉक केले जाणार आहे. अशा मेसेजमुळे घाबरून अनेक ग्राहक घाईघाईत चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता असून, ही एक सुनियोजित फसवणूक (Scam) असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
APK फाईल डाऊनलोड करणं ठरेल घातक
या व्हॉट्सॲप स्कॅममध्ये गुन्हेगार केवळ मेसेजच पाठवत नाहीत, तर त्यासोबत एक 'APK' फाईल देखील पाठवतात. ॲप पुन्हा सुरू करण्यासाठी ही फाईल इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. मात्र, यामागील सत्य अत्यंत भयंकर आहे. यामुळे लक्षात ठेवा :
– बँक कधीही व्हॉट्सॲपवर कोणतीही फाईल इन्स्टॉल करण्यास सांगत नाही.
– ही APK फाईल प्रत्यक्षात एक 'मॅलवेअर' किंवा हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर असते.
– एकदा का ही फाईल फोनमध्ये आली की, तुमच्या फोनचा संपूर्ण ताबा हॅकर्सच्या हातात जातो.
हेही वाचा – EPFO Wage Increase: नोकरदारांची दिवाळी; आता निवृत्तीनंतर मिळणार छप्परफाड पैसा; EPFO च्या नियमात हे मोठे बदलक्षणार्धात रिकामं होऊ शकतं बँक खातं
सायबर तज्ज्ञांच्या मते, या फाईलच्या माध्यमातून तुमचे पासवर्ड, ओटीपी (OTP) आणि सर्व बँकिंग तपशील चोरीला जाऊ शकतात. यामुळे हॅकर्स तुमच्या नकळत खात्यातून सर्व पैसे दुसऱ्या खात्यात वळवू शकतात. बँकेने आपल्या ग्राहकांना बजावले आहे की, कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा व्हॉट्सॲपवरून आलेली फाईल चुकूनही डाऊनलोड करू नका. अशा प्रकारच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी केवळ बँकेच्या अधिकृत पोर्टलचा किंवा जवळच्या शाखेचाच वापर करावा.बँकेकडून
बँकिंग व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
तुमच्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तुमच्या खात्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे:
– नेहमी लक्षात ठेवा की अधिकृत ॲप केवळ 'गुगल प्ले स्टोअर' किंवा 'ॲपल ॲप स्टोअर'वरूनच डाऊनलोड किंवा अपडेट करावे.
– अनोळखी मेसेजेसना प्रतिसाद टाळा: व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकला उत्तर देऊ नका; असा मेसेज आल्यास तो नंबर त्वरित रिपोर्ट आणि ब्लॉक करा.
– कोणत्याही परिस्थितीत आपली वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील अनोळखी कॉलर किंवा मेसेजवर शेअर करू नका.
– अधिकृत स्त्रोतांचा वापर: बँकिंग संबंधित कोणत्याही बदलासाठी किंवा माहितीसाठी नेहमी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा तुमच्या जवळच्या बँक शाखेशी थेट संपर्क साधा.
– गोपनीयता पाळा: तुमचा ओटीपी (OTP), पिन किंवा पासवर्ड कधीही कोणाशीही शेअर करू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेली फाईल आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करणे टाळा.
जर तुम्हाला असा कोणताही संशयास्पद मेसेज आला, तर तात्काळ बँकेला कळवा किंवा सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवा. सतर्क राहणे हाच सायबर हल्ल्यांपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.
एसबीआय आणि पीआयबीकडून सुरक्षिततेचा मंत्र; ऑनलाईन बँकिंग करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण चेतावणी दिली आहे. बँकेने स्पष्टपणे बजावले आहे की, 'एसबीआय योनो' किंवा इतर कोणतेही बँकिंग ॲप केवळ 'गुगल प्ले स्टोअर' (Google Play Store) किंवा 'ॲपल ॲप स्टोअर' (Apple App Store) यांसारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच डाऊनलोड किंवा अपडेट करावे. व्हॉट्सॲपवर बँकिंग अपडेट्स किंवा सॉफ्टवेअर फाईल्स पाठवणे हे बँकेच्या कार्यपद्धतीत बसत नाही, त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करणे धोक्याचे ठरू शकते. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) या सरकारी संस्थेनेही या प्रकरणाची सखोल चौकशी करून, आधार अपडेटच्या नावाखाली येणारे सर्व मेसेजेस बनावट असल्याचे जाहीर केले आहे.