Mysuru Viral Video: सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघवी करण्याच्या घाणेरड्या सवयीला आळा घालण्यासाठी म्हैसूर शहर प्रशासनाने एक अजब पण धाडसी प्रयोग केला आहे. शहरातील उपनगरीय बसस्थानकाजवळील ज्या भिंतींवर लोक वारंवार लघवी करतात, तिथे आता मोठे परावर्तक आरसे (Reflective Mirrors) बसवण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या ‘आरसा’ कल्पनेमुळे सध्या नागरिक आणि नेटिझन्समध्ये दोन तट पडले असून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
नेमकी काय आहे ही ‘आरसा’ मोहीम?
म्हैसूर बसस्थानकाबाहेरील एका भिंतीवर स्टीलचे चकचकीत आरसे लावलेले व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. उघड्यावर लघवी करायला येणाऱ्या व्यक्तीला आरशात स्वतःचेच प्रतिबिंब दिसावे आणि त्यातून त्याला ‘लाज’ वाटून त्याने तिथून निघून जावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘शशांक’ नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत, “ज्याला ही कल्पना सुचली तो नोबेलसाठी पात्र आहे,” अशी उपरोधिक टिप्पणी केली आहे.
नेटकऱ्यांमध्ये वादाची ठिणगी: कल्पकता की पायाभूत सुविधांचा अभाव?
हा व्हिडिओ व्हायरल होताच भारतीय शहरांमधील सार्वजनिक स्वच्छतेच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. काहींनी या कल्पनेचे स्वागत करत “हाच खऱ्या अर्थाने समाजाला आरसा दाखवण्याचा प्रकार आहे,” असे म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेक वापरकर्त्यांनी प्रशासनावर टीका केली आहे. “केवळ आरसे लावून लोकांची लाज काढण्यापेक्षा प्रशासनाने स्वच्छ सार्वजनिक शौचालये का बांधली नाहीत?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
100 मीटरवर 4 शौचालये, तरीही सवय सुटेना!
टीकेला उत्तर देताना व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने एक महत्त्वाची माहिती दिली. या जागेच्या अवघ्या 100 मीटर परिसरात किमान 4 सार्वजनिक शौचालये उपलब्ध आहेत, तरीही लोक रस्त्यावर लघवी करणे पसंत करतात. यावरून ही समस्या केवळ सुविधांची नसून नागरिकांच्या मानसिकतेची आणि नागरी जाणीवेच्या (Civic Sense) अभावाची असल्याचे अधोरेखित होत आहे.
Whoever came up with this idea deserves nothing less than a Nobel… Genius ??? pic.twitter.com/hI7cTkcKH8 — Akki Rotti (@Theshashank_p) May 6, 2026
उपाय टिकणार की तोडफोड होणार?
या उपक्रमावर विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच काही लोकांनी याच्या टिकाऊपणावर शंका व्यक्त केली आहे. “लोक हे आरसे तोडतील आणि मग तिथे लघवी करतील,” अशी भीती एकाने व्यक्त केली. तर दुसऱ्या एकाने सुचवले की, “केवळ नियमांनी बदल होणार नाही, तर शालेय स्तरापासूनच मुलांमध्ये स्वच्छतेचे संस्कार रुजवले पाहिजेत, तरच पुढच्या पिढीमध्ये बदल दिसेल.” सध्या म्हैसूरचा हा प्रयोग यशस्वी होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.