Induction Buying Guide: मध्यपूर्वेतील तणाव आणि 'स्ट्रोट ऑफ होर्मुज'मधील विस्कळीत पुरवठ्यामुळे सध्या गॅस सिलिंडरसाठी रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी गॅसअभावी खानावळी आणि स्टॉल्स बंद आहेत. या अस्थिरतेमुळे अनेक ग्राहक आता पर्यायी व्यवस्था म्हणून इंडक्शन कुकटॉप (Induction Cooktop) खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, केवळ घाईत आणि भीतीपोटी खरेदी केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.
इंडक्शन खरेदी करताना खालील 10 चुका टाळल्यास तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल
1. वॅटेज (Wattage) कडे दुर्लक्ष
स्वस्त इंडक्शन सहसा कमी वॅटचे असतात, ज्यामुळे स्वयंपाक व्हायला वेळ लागतो. जलद स्वयंपाकासाठी 1800W ते 2000W क्षमतेचे मॉडेल निवडणे कधीही उत्तम.
2. भांड्यांची सुसंगतता न तपासणे
इंडक्शनवर केवळ ज्या भांड्यांचा तळ सपाट आहे आणि ज्याला चुंबक चिकटते (लोखंड किंवा स्टील), तीच भांडी चालतात. ॲल्युमिनियम, तांबे किंवा काचेची भांडी यावर काम करत नाहीत.
3. आकाराचा चुकीचा अंदाज
तुमच्या किचन ओट्याची जागा आणि तुमच्या घरातील भांड्यांचा आकार लक्षात घेऊनच योग्य आकाराचा कुकटॉप निवडा.
4. 'प्रीसेट कुकिंग मोड'ची अनुपस्थिती
दूध गरम करणे, चहा किंवा डोसा बनवण्यासाठी स्वतंत्र बटणे (Modes) असल्यास वीज वाचते आणि कामाचा ताणही कमी होतो.
5. तापमानावर नियंत्रणाचा अभाव
ज्या इंडक्शनमध्ये तापमानाचे (Temperature/Power levels) जास्त पर्याय असतात, तिथे स्वयंपाकावर अधिक चांगले नियंत्रण राहते. किमान 6 ते 8 लेव्हल्स असलेले मॉडेल निवडा.
6. सुरक्षेकडे (Safety) दुर्लक्ष
'ऑटोमॅटिक शट-ऑफ' (Automatic Shut-off) आणि 'चाइल्ड लॉक' यांसारखे फिचर्स असणे अनिवार्य आहे. यामुळे भांडे ओट्यावरून काढताच इंडक्शन आपोआप बंद होते आणि अपघात टळतो.
7. विजेचा वापर (Energy Efficiency)
खरेदी करताना तो कुकटॉप किती वीज वापरतो आणि त्याचे पॉवर मॅनेजमेंट कसे आहे, हे तपासा. दर्जेदार कंपनीचे इंडक्शन वीजबिल कमी राखण्यास मदत करतात.
8. कंट्रोल पॅनलची निवड
टच पॅनल दिसायला स्टायलिश आणि स्वच्छ करायला सोपे असतात, पण पुश बटण (Tactile Buttons) अधिक टिकाऊ आणि ओल्या हातांनी वापरण्यास सोपे असतात.
9. आफ्टर सेल्स सर्विस (After Sales Service)
ब्रँड कितीही मोठा असला, तरी तुमच्या शहरात किंवा परिसरात त्यांचे सर्व्हिस सेंटर आहे का, याची खात्री नक्की करा.
हेही वाचा – Gold Price : आता सोनं घेण परवडणार! केंद्र सरकारने बदलले नियम; नव्या नियमांमुळे सोन्याचे दर घसरणार
10. केवळ किमतीला महत्त्व
कमी किमतीत मिळणारे 'लोकल' इंडक्शन लवकर खराब होतात आणि विजेचा वापरही जास्त करतात. वॉरंटी आणि ग्राहकांच्या प्रतिसादाचा (Reviews) विचार करूनच गुंतवणूक करा. गॅसची टंचाई ही आजची समस्या असली, तरी इंडक्शन ही तुमच्या स्वयंपाकघरातील दीर्घकालीन गुंतवणूक आहे. त्यामुळे केवळ घाईत कोणताही निर्णय न घेता विचारपूर्वक निवड करा.