Warren Buffett Retirement : जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार आणि 'बर्कशायर हॅथवे'चे सर्वेसर्वा वॉरन बफेट अखेर वयाच्या 95 व्या वर्षी, 2025 च्या अखेरीस निवृत्ती घेणार आहेत. एका साध्या कापड उद्योगापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज 1 ट्रिलियन डॉलर्सच्या अवाढव्य साम्राज्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यांनी गेल्या अनेक दशकांत भागधारकांना लिहिलेल्या पत्रांमधून गुंतवणुकीचे जे मंत्र दिले, ते आजच्या पिढीसाठी कोणत्याही पाठ्यपुस्तकापेक्षा कमी नाहीत.
1. जेव्हा भीती असते, तेव्हाच संधी शोधा
बफेट यांचे गुंतवणुकीबद्दलचे सर्वात गाजलेले वाक्य 1986 च्या पत्रात पाहायला मिळते. ते म्हणतात, "जेव्हा बाजारात इतर लोक लोभी असतात, तेव्हा तुम्ही सावध (भयभीत) राहा आणि जेव्हा संपूर्ण बाजार भीतीच्या छायेखाली असतो, तेव्हाच तुम्ही लोभी व्हा (गुंतवणूक करा)." याचाच अर्थ स्वस्त दरात शेअर्स खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ मंदीच्या काळात असते.
2. चुका मान्य करा आणि त्यामधून शिका
वॉरन बफेट यांनी कधीही आपल्या चुका लपवल्या नाहीत. 1965 मध्ये बर्कशायर हॅथवे ही डबघाईला आलेली कापड कंपनी खरेदी करणे ही एक मोठी चूक होती, हे त्यांनी मान्य केले. तसेच, 1998 मध्ये 'जनरल री' या कंपनीच्या अधिग्रहणासाठी रोख रकमेऐवजी बर्कशायरचे 272,000 शेअर्स देणे ही त्यांची 'भयंकर चूक' होती. या चुकीमुळे भागधारकांचे मोठे नुकसान झाले, हे सांगताना त्यांनी गुंतवणुकीत शेअर्सपेक्षा रोख रकमेचे महत्त्व अधोरेखित केले.
3. संधी आल्यावर मोठी तयारी ठेवा
आर्थिक मंदी किंवा बाजारातील घसरण ही बफेट यांच्यासाठी गुंतवणुकीची मोठी संधी असते. ते म्हणतात, "जेव्हा संधींचा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा चमचे घेऊन नाही, तर बादल्या (पाट्या) घेऊन बाहेर पडले पाहिजे." म्हणजेच, बाजार खाली असताना तुमच्याकडे मोठी गुंतवणूक करण्यासाठी भांडवल तयार असणे आवश्यक आहे. त्यांचे ध्येय नेहमीच S&P 500 निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी करणे हे राहिले आहे.
4. अहंकार आणि शिस्तीचा अभाव
1994 मध्ये बफेट यांनी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर (CEO) कडक टीका केली होती. त्यांच्या मते, "नैसर्गिक प्रवृत्ती आणि अहंकार" यामुळे अनेक बडे अधिकारी कंपनीचे अतिरिक्त भांडवल खर्च करताना शिस्त पाळत नाहीत. ते अनेकदा विक्रेत्यांनी दिलेल्या फुगवलेल्या अंदाजांवर विश्वास ठेवून चुकीची अधिग्रहणे करतात, ज्याचा फटका शेवटी भागधारकांना बसतो.
5. भांडवल वाटपाचे स्वातंत्र्य
बर्कशायर खरेदी करणे चूक असली, तरी त्यातून त्यांना एक महत्त्वाचा धडा मिळाला. त्यांना जाणीव झाली की भांडवल कुठे आणि कसे गुंतवायचे, यावर कोणतेही संस्थात्मक बंधन नसावे. याच स्वातंत्र्यामुळे ते एका कापड उद्योगाला जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक कंपनीत रूपांतरित करू शकले.
हेही वाचा – Income Tax Update: करदात्यांना मोठा दिलासा! आयकर विभागाने ई-फाइलिंग पोर्टलमध्ये केला 'हा' मोठा बदल