Bank Loan Recovery: आजच्या काळात आर्थिक गरज भागवण्यासाठी कर्ज घेणे ही सामान्य बाब झाली आहे. घर खरेदीपासून ते वाहन घेण्यापर्यंत, तसेच वैयक्तिक खर्चासाठीही लोक मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची कर्जे घेतात. मात्र, कर्जदाराचा अचानक मृत्यू झाल्यास या कर्जाचं नेमके काय होतं? बँका कर्ज माफ करतात की वसुलीची प्रक्रिया पुढे चालू ठेवतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्यक्षात कर्जाचा प्रकार, त्यासोबतची हमी आणि विमा यावर बँकेची कारवाई अवलंबून असते.
गृहकर्जदाराचा मृत्यू झाल्यास काय घडते?
गृहकर्ज सहसा दीर्घकालीन असते. अशावेळी कर्जदाराचा मृत्यू झाल्यावर बँकेकडून सर्वात आधी सहकर्जदार किंवा हमीदाराशी संपर्क साधला जातो. हे दोघेही कर्ज परतफेडीस नकार देत असल्यास बँक कायदेशीर प्रक्रिया सुरू करते. सुरुवातीला कुटुंबाला नोटीस देऊन परतफेड करण्याची संधी दिली जाते. तरीही प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित घर किंवा मालमत्ता जप्त करून लिलावाच्या प्रक्रियेत टाकली जाते. जर गृहकर्जावर "होम लोन इन्शुरन्स" घेतला असेल, तर अशा परिस्थितीत विमा कंपनी कर्जाची उर्वरित रक्कम भरते आणि कुटुंबावर कोणताही आर्थिक ताण येत नाही.
हेही वाचा - Job Opportunity: केवळ मुलाखत द्या आणि सरकारी नोकरी मिळवा; या क्षेत्रातील तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी
वाहन कर्जावर बँकेची पुढील कारवाई
वाहन कर्ज हे ‘सिक्योर्ड लोन’ मानले जाते, कारण वाहनच बँकेसाठी हमी असते. कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक कुटुंबाशी संपर्क करून उर्वरित रक्कम परतफेड करण्याची विनंती करते. उर्वरित कर्ज फेडले नाही तर वाहन जप्त केले जाते आणि लिलावात विक्री करण्यात येते. वाहन विक्रीतून मिळालेली रक्कम कर्जापेक्षा कमी असल्यास उर्वरित रक्कम भरावी लागते. त्यामुळे मोठे वाहन कर्ज असल्यास कुटुंबाला अडचण भासू शकते.
हेही वाचा - Maharashtra Agriculture Scheme: अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतजमिनींसाठी मोठा दिलासा; राज्य सरकारचा 'हा' ऐतिहासिक निर्णय
वैयक्तिक कर्जाची वसुली कशी केली जाते?
वैयक्तिक कर्ज हे अनसिक्योर्ड लोन अर्थात गहाण नसलेले कर्ज असते. कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक प्रथम सहकर्जदार किंवा हमीदाराशी संपर्क साधते. हे दोघेही परतफेड करू शकत नसल्यास, नंतर बँक कुटुंबाशी संवाद साधते. कर्जदाराच्या नावावर काही मालमत्ता असल्यास तिच्या जप्ती व लिलावाद्वारे वसुली केली जाते. मात्र कर्जदाराकडे कोणतीही संपत्ती नसेल आणि कर्ज परतफेड होऊ शकत नसेल तर हे कर्ज एनपीए (NPA) म्हणून वर्गीकृत केले जाते. अशा कर्जाची वसुली होणे कठीण असते आणि बँकेला याचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो.