Snake in Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेससारख्या हाय-टेक रेल्वेमध्ये साप सोडून प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका माथेफिरूचा मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) छडा लावला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवत आरोपीला मुंब्रा येथून अटक केली आहे. ही धक्कादायक घटना 27 डिसेंबर रोजी घडली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली. अखेर 12 फेब्रवारी 2026 रोजी आरपीएफने मुंब्रा परिसरातून 37 वर्षीय जगन अर्जुन भाले याला ताब्यात घेतले.
शौचालयातील सापाने उडाली होती खळबळ
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) मधील C-16 कोचच्या शौचालयात अचानक एक साप दिसून आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तातडीने ते शौचालय प्रवाशांसाठी बंद करण्यात आले आणि सोलापूर स्थानकावर सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हा साप तिथे आपोआप आला की कोणी मुद्दाम ठेवला, याबाबत आरपीएफने तपास सुरू केला असता सीसीटीव्हीमध्ये एक संशयास्पद व्यक्ती शौचालयात जाताना आणि येताना कैद झाली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने एक विशेष तपास पथक नियुक्त केले होते.
हेही वाचा - Vande Bharat Train: प्रवाशांच्या जिवाशी खेळ; वंदे भारत ट्रेनमध्ये मुद्दाम साप सोडला, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा पोलिसांनी केला पर्दाफाश
तपासाचे चक्र फिरले आणि आरोपी गजाआड; 14 दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी जगन भाले याला कल्याण येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे मध्य रेल्वे आरपीएफच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही कृत्याविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याने रेल्वे सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जगन हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्यावर रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 (B), 147 आणि 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Holi Special Trains: होळीसाठी रेल्वेचं स्पेशल गिफ्ट! यंदा धावणार 1,409 विशेष गाड्या; कन्फर्म तिकीट मिळणं होणार सोपं, पाहा यादी