यंदा पावसाळ्यावर एल-निनोचा तीव्र प्रभाव असल्यामुळे पावसाने अर्ध्यातच दांडी मारली. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होताच महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल जाणवू लागला आहे. राज्यातील उच्चांकी 37.4 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी म्हणजे 17.7 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे 50 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यात दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागांत पावसाच्या सरी सुरू असल्या तरी अनेक ठिकाणी दुपारच्या तापमानात वाढ होत असून ‘ऑक्टोबर हिट’चा चटका जाणवत आहे. तसेच राज्यातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यावेळी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. याशिवाय मध्य महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
हेही वाचा- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मदतीचा मार्ग मोकळा; पंचनामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठरली
तसेच मराठवाड्याच्या अंतर्गत भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामान, ऊन-सावल्यांचा खेळ आणि उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे. यादरम्यान नागपुरात ऑक्टोबरच्या उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत, मंगळवारी कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक 36.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
सकाळपासूनच सूर्याच्या तीव्र किरणांमुळे नागरिक हैराण होत आहेत. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण 63 टक्क्यावर पोहोचल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. सध्या नागपूर सह विदर्भात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी अधिक राहण्याच्या अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत मान्सून पूर्णपणे माघार घेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल. परतीचा मान्सून सक्रिय राहिल्यास वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.