Richard Mille Luxury Watches: भारत दौऱ्यावर आलेल्या फुटबॉल जगतातील दिग्गज लिओनेल मेस्सीला उद्योगपती अनंत अंबानी यांनी अतिशय खास आणि महागडी भेट दिल्याने जगभरात चर्चा रंगली आहे. अनंत अंबानी यांनी मेस्सीला रिचर्ड मिल या प्रीमियम ब्रँडचे सुमारे 11 कोटी रुपयांचे (अंदाजे 1.1 अब्ज डॉलर्स) घड्याळ भेट दिले. या घटनेनंतर रिचर्ड मिल ब्रँड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
करोडोंचे घड्याळ
सध्या भारतातील अतिश्रीमंत आणि सेलिब्रिटी वर्गात रिचर्ड मिल घड्याळाची मोठी क्रेझ पाहायला मिळते. मात्र, ही घड्याळे सर्वसामान्यांसाठी नाहीत. कोट्यवधी रुपयांची किंमत, मर्यादित उत्पादन आणि अत्याधुनिक अभियांत्रिकीमुळे हा ब्रँड केवळ निवडक लोकांपुरताच मर्यादित आहे. अनंत अंबानी यांनी मेस्सीला दिलेली भेट ही त्याचेच उदाहरण मानली जात आहे.
भारतीय सेलिब्रिटींच्या संग्रहात रिचर्ड मिल
भारतामध्ये रिचर्ड मिल घड्याळ असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या संग्रहात 5 कोटींपेक्षा अधिक किमतीची अनेक घड्याळे आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ‘RM 052’ मॉडेल घालताना दिसून आला आहे. तर दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि अंबानी कुटुंबाकडे ड्रॅगन थीमवर आधारित खास एडिशनची घड्याळे आहेत.
हेही वाचा – India's Strict Action against Bangladesh : भारताचे बांगलादेशला कडक प्रत्युत्तर; ढाका येथील व्हिसा केंद्र बंद
परंपरेपेक्षा आधुनिक अभियांत्रिकीवर भर
सुमारे 25 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रिचर्ड मिल ब्रँडने पारंपरिक घड्याळ निर्मितीपासून वेगळी वाट निवडली. संस्थापक रिचर्ड मिल यांनी रेसिंग कारसारखे हलके, मजबूत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत घड्याळ तयार करण्याचे स्वप्न पाहिले. 2001 मध्ये सादर झालेले ‘RM 001 टर्बिलॉन’ हे त्याचे पहिले मॉडेल होते, ज्याची किंमत तेव्हाच लाखो डॉलर्समध्ये होती आणि केवळ 17 नग तयार करण्यात आले होते.
खेळाच्या मैदानातही घड्याळाची कसोटी
रिचर्ड मिल ब्रँडची खास ओळख म्हणजे खेळाडू थेट खेळताना ही घड्याळे परिधान करतात. टेनिसपटू राफेल नदालचे ‘RM 027’ हे अवघ्या 20 ग्रॅम वजनाचे घड्याळ, धावपटू योहान ब्लेक आणि फॉर्म्युला 1 ड्रायव्हर्स यांच्याकडून प्रत्यक्ष शर्यतीत वापरले जाते. यामुळे घड्याळांची टिकाऊपणा आणि धक्का सहन करण्याची क्षमता प्रत्यक्षात तपासली जाते.
स्पेस आणि रेसिंग तंत्रज्ञानाचा वापर
या ब्रँडच्या घड्याळांमध्ये टायटॅनियम, ग्राफीन आणि कार्बन टीपीटीसारख्या एरोस्पेस व मोटरस्पोर्ट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे घड्याळ अत्यंत हलके, मजबूत आणि आधुनिक बनते. बाह्य भाग अत्याधुनिक मशिन्सने तयार केला जात असला, तरी आतील जटिल यंत्रणा आजही कुशल कारागिरांच्या हातांनी बनवली जाते.
कमी उत्पादन, प्रचंड उलाढाल
मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार, रिचर्ड मिल दरवर्षी केवळ सुमारे 6 हजार घड्याळे तयार करतो. तरीही उलाढालीच्या बाबतीत हा ब्रँड जगातील सहावा सर्वात मोठा घड्याळ निर्माता ठरला आहे. जरी त्याच्या डिझाइन आणि किंमतींवर टीका होत असली, तरी मर्यादित उत्पादन, आक्रमक मार्केटिंग आणि अत्याधुनिक अभियांत्रिकीमुळे रिचर्ड मिल आज जगातील सर्वात खास लक्झरी ब्रँडपैकी एक मानला जातो.