Anurag Thakur on Rahul Gandhi: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सोमवारी काँग्रेस नेते तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी देशात अस्थिरता आणि अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला. राहुल गांधींच्या राजकारणाचा मुख्य उद्देश घटनात्मक संस्थांना कमकुवत करणे आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा डागाळणे हाच आहे, असा दावाही त्यांनी भाजप मुख्यालयातील पत्रकार परिषदेत केला.
भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘देशाने यापूर्वी कोणत्याही विरोधी पक्षनेत्याकडून अशा प्रकारचे नाटक आणि गदारोळ पाहिला नाही.’ त्यांनी राहुल गांधींचे वर्णन ‘अस्थिरता निर्माण करणारे, अराजकतावादी आणि असंवेदनशील नेते’ असे केले. घटनात्मक संस्थांना सातत्याने लक्ष्य करण्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधींकडून वारंवार होणाऱ्या ‘मतचोरी’च्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ठाकूर म्हणाले की, राहुल गांधी थेट जनतेच्या जनादेशाला आव्हान देत आहेत. तसेच त्यांचे राजकारण केवळ पोकळ विधाने, निराधार आरोप, दिखाऊ आंदोलने आणि तथ्यांचा अभाव यावर आधारित आहे. राहुल गांधी निवडणूक आयोग, ईव्हीएम (EVM) आणि मुख्य निवडणूक आयुक्तांसह देशातील विविध महत्त्वाच्या संस्थांची प्रतिमा मलिन करत आहेत.
हे देखील वाचा: “मी यांना इशारा देतो जर तुम्ही…” फडणवीसांची आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया; थेट इशारा देत म्हणाले,
विरोधी पक्षनेत्याच्या भाषेवर आणि भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत अनुराग ठाकूर म्हणाले, ‘राहुलजी, देशाला सत्याची गरज आहे, गोंधळाची नाही. आम्हाला पुराव्यांची गरज आहे, केवळ आरोपांची नाही. देशाला राजकीय वक्तृत्वापेक्षा स्पष्ट उत्तरांची गरज आहे.’ आपल्या वक्तव्यात ठाकूर यांनी राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रसंगांचाही उल्लेख केला आणि म्हणाले की राहुल गांधी तक्रार घेऊन राष्ट्रपतींकडे गेले होते, तेव्हा त्यांना पुराव्यांची मागणी करण्यात आली होती; परंतु त्यानंतर ते या विषयावर गप्प राहिले. सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे की न्यायालयाचा वापर राजकीय रणांगण म्हणून केला जाऊ शकत नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या भूमिकेतील विरोधाभास चव्हाट्यावर आणला. जे लोक आयुष्यभर भगवान श्री रामाच्या अस्तित्वाच्या आणि विरोधात राहिले, तेच आता ‘भगवान शिवाच्या वरातीबद्दल’ बोलत आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला. विरोधी पक्षांच्या आगामी मोर्च्यावर ताशेरे ओढताना त्यांनी म्हटले की, हा कोणता जनहितार्थ काढलेला मोर्चा नसून रस्त्यावर उतरलेल्या काही अराजक घटकांचा जमाव आहे. राजकीय सत्ता मिळवण्यासाठी हा पक्ष आता डाव्या विचारसरणीचे लोक आणि विविध परकीय संस्थांवर विसंबून राहिला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
हे देखील वाचा: दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरूच; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसकडून याचिका दाखल
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.