पाणी पाहताच घाबरला.. जोरात किंचाळला, श्वास घुसमटला; कुत्र्याचे नख लागल्याचे निमित्त.. अन् 14 वर्षीय शाळकरी मुलाचा रेबीजने दुर्दैवी मृत्यू

लहान मुलांना प्राण्यांची आवड असणे स्वाभाविक असले तरी प्राण्यांशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या शरीरावर होणाऱ्या छोट्या-मोठ्या ओरखड्यांकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

पाणी पाहताच घाबरला.. जोरात किंचाळला, श्वास घुसमटला; कुत्र्याचे नख लागल्याचे निमित्त.. अन् 14 वर्षीय शाळकरी मुलाचा रेबीजने दुर्दैवी मृत्यू
dog bite

14 Years Old Boy Rabies Death: शनिवारच्या दिवशी इयत्ता 7 वीत शिकणारा 14 वर्षीय अतुल नेहमीप्रमाणे हसत-खेळत शाळेत पोहोचला होता. मात्र वर्गात बसल्यानंतर काही वेळातच त्याला तीव्र अस्वस्थता जाणवू लागली आणि श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास होऊ लागला. घुसमट होत असल्याने तो वारंवार जागेवरून उठू लागला, तसेच त्याला अचानक पाण्याची प्रचंड भीती (हायड्रोफोबिया) वाटू लागली. वर्गात पाण्याचा ग्लास दिसताच तो प्रचंड घाबरला आणि शिक्षक विजय लक्ष्मी यांनी धीर देत दिलेले पाणी समोर येताच तो जोरात किंचाळत वर्गातून बाहेर पळाला. मुलाची ही भयानक अवस्था पाहून वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक पुरते हादरून गेले.

उपचारादरम्यान ग्रील पकडून किंचाळणं.. विव्हळणं; मुलाच्या जाण्याने कुटुंब उध्वस्त
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळेने तातडीने त्याच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. पालकांनी त्याला तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात नेले, परंतु तिथेही त्याची प्रकृती वेगाने खालावत गेली. उपचारादरम्यान तो रुग्णालयाच्या गेटची ग्रील पकडून प्रचंड किंचाळत होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला रेबीजचा (Rabies) अत्यंत गंभीर संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे आई फूलकुमारी, वडील राकेश आणि त्याच्या 3 भावांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुत्र्याला खाऊ घालताना 2 महिन्यांपूर्वी लागले होते नख
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे घडलेल्या या घटनेमागे एका अत्यंत किरकोळ गोष्टीकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरले. अतुलला मुक्या प्राण्यांची, विशेषतः भटक्या कुत्र्यांची भारी आवड होती. सुमारे 2 महिन्यांपूर्वी एका श्वानाला खाऊ घालत असताना कुत्र्याचे नख त्याच्या बोटाला लागले होते. कोणतीही मोठी जखम किंवा रक्तस्त्राव न झाल्यामुळे अतुलने याकडे किरकोळ घटना म्हणून दुर्लक्ष केले आणि पालकांनाही काही सांगितले नाही. त्यामुळे वेळेवर अँटी-रेबीज लस (Anti-Rabies Vaccine) घेतली गेली नाही आणि हीच बाब धोकादायक बनून पुढे त्याच्या जीवावर बेतली.

हेही वाचा – शाळकरी विद्यार्थ्याचा FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे वडापावसाठी हट्ट; मुंढेंनी समजावताच… Video Viral

डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला; किरकोळ जखम किंवा नख लागल्यास काय करावे?
या दुर्दैवी घटनेनंतर डॉ. राजपाल यांनी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे. कोणताही कुत्रा किंवा स्तनधारी प्राणी चावल्यास अथवा त्याचा नख लागल्यास त्याला कधीही हलक्यात घेऊ नये. जखम छोटी असो वा मोठी, ती कमीत कमी 15 मिनिटे साबणाने आणि वाहत्या पाण्याने स्वच्छ धुतली पाहिजे. यानंतर कोणत्याही लक्षणांची वाट न पाहता तातडीने डॉक्टरांकडे जाऊन रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेणे अनिवार्य आहे, अन्यथा हा संसर्ग थेट प्राणघातक ठरू शकतो.

पालकांसाठी धोक्याची घंटा; मुलांच्या संशयास्पद जखमांकडे लक्ष देणे गरजेचे
लहान मुलांना प्राण्यांची आवड असणे स्वाभाविक असले तरी प्राण्यांशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या शरीरावर होणाऱ्या छोट्या-मोठ्या ओरखड्यांकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वेळेवर घेतलेली एक लस मुलाचा जीव वाचवू शकते. अतुलच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोग्य प्रशासनाने रेबीजबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! हेल्थ इन्शुरन्स असूनही उपचारांसाठी खिशातून पैसे भरावे लागणार?; काय आहे नवा नियम

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number