भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांना FDA आयुक्त तुकाराम मुंढे अजिबात सोडत नाहीत. त्यांच्या धडाकेबाज कारवायांसाठी ते ओळखले जातात, इतकेच नाही तर त्यांच्या कामाची दखल न्यूयॉर्कच्या वृत्तपत्रानेही घेतली होती.
मात्र आता मुंढे यांची एक वेगळी आणि संवेदनशील बाजू समोर आली आहे, जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एका कार्यक्रमादरम्यान एका शाळकरी विद्यार्थ्याने थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे वडापाव आणि चायनीज भेळ खाण्यासाठी हट्ट धरला. त्याच्या शाळेत वडापाववर बंदी घातल्याचे त्याने सांगितले. हे ऐकून मुंढे यांनी त्याच्याच भाषेत अगदी शांतपणे आणि आपुलकीने समजावले. या संवादाचा व्हिडिओ आता सर्वत्र चर्चेत आहे.
विद्यार्थ्याची तक्रार ऐकून घेतल्यानंतर मुंढे यांनी त्याला समजावत सांगितले की, आवडता पदार्थ खाणे हा आनंदाचा भाग आहे, पण वाढत्या वयात शरीराला योग्य पोषण मिळणे जास्त गरजेचे आहे.
“वडापाव नाही खाल्ला म्हणून काही बिघडत नाही, उलट पौष्टिक आहार घेतल्याने तुमची वाढ चांगली होईल,” असे मुंढे म्हणाले. आहारात प्रथिने, कर्बोदके, चांगले फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश असावा, असा सल्ला त्यांनी दिला. मुलांनी डाळी, कडधान्ये, दूध, दही, अंडी यांसारख्या पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.
त्याचवेळी चायनीज पदार्थांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुंढे यांनी स्वच्छता आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. फक्त चव न पाहता तो पदार्थ कसा आणि कुठे बनवला जातो, हे पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांमध्ये जंक फूडवर बंदी
राज्यातील शाळांमध्ये जंक फूड आणि तेलकट पदार्थांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शाळेच्या आवारात आणि परिसरात अशा पदार्थांची विक्री, मोफत वाटप आणि जाहिरातींवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळेच वडापाव, समोसा यांसारखे विद्यार्थ्यांचे आवडते पदार्थ कँटीनमधून हटवण्यात आले आहेत.