मुंबई, १८ मे २०२४, प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला १७ मेपासून सुरुवात झाली असून, ३१ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यापूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पालिका शिक्षण विभागाने केले आहे. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असला तरी त्याचा या प्रवेशप्रक्रियेत विचार केला जाणार नाही. त्यामुळे नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील ३१९ पात्र शाळांत 'आरटीई'च्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाच हजार ६७० जागा उपलब्ध आहेत.