शिवप्रेमींसाठी मोठी खुशखबर! रायगड रोपवे पुन्हा सुरू, अवघ्या 4 मिनिटांत गाठता येणार किल्ला

गेल्या दीड महिन्यांपासून देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद असलेली रायगड किल्ल्यावरील रोपवे सेवा 3 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे.

शिवप्रेमींसाठी मोठी खुशखबर! रायगड रोपवे पुन्हा सुरू, अवघ्या 4 मिनिटांत गाठता येणार किल्ला
रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेली रायगड रोपवे सेवा ३ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रायगड दर्शनासाठी जाण्याचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.रायगड किल्ल्यावरील रोपवे सेवा 21 सप्टेंबरपासून बंद ठेवण्यात आली होती. रोपवेची तांत्रिक तपासणी, आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षिततेशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. या काळात गडावर जाणाऱ्या पर्यटकांना पायरी मार्गाचा आधार घ्यावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि शारीरिक अडचणी असलेल्या व्यक्तींना यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

मात्र, आता देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर रोपवे सेवा पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या सुविधेमुळे गडाच्या पायथ्यापासून वर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. रोपवेच्या माध्यमातून अवघ्या चार मिनिटांत रायगड किल्ल्यावर पोहोचता येते. त्यामुळे अवघड चढाई टाळून पर्यटकांना गडाचे ऐतिहासिक वैभव अनुभवता येणार आहे.

रोपवे व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमित देखभाल आणि तांत्रिक तपासणी केली जाते. यंदाही आवश्यक कामे पूर्ण करून सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रायगडावर शिवभक्त आणि पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोपवे सुरू झाल्याने पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गडावर जाण्यापूर्वी पर्यटकांनी रोपवेच्या वेळा, तिकीट दर आणि उपलब्धतेची अधिकृत संकेतस्थळावरून खात्री करून घ्यावी.

रोपवेची लांबी सुमारे 760 मीटर असून उंचीतील अंतर 420 मीटर आहे. अधिकृत माहितीनुसार, रोपवेची सेवा सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत उपलब्ध असते. पर्यटकांनी प्रवासासाठी निघण्यापूर्वी तिकीट आणि वेळापत्रकाची माहिती तपासणे आवश्यक आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number