Friday, March 13, 2026 07:10:39 AM

Bhandup Railway Station : 'त्या' घटनेनंतर मोठा निर्णय! भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना प्रवेशबंदी; सीमारेषा ओलांडल्यास इतका दंड

रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या रिक्षांना आता प्रशासनाने 'नो एन्ट्री' केली आहे. यामुळे प्रवाशांना काही अंतर चालत जावे लागत असले, तरी वाहतूक कोंडीतून मात्र सुटका होताना दिसत आहे.

bhandup railway station  त्या घटनेनंतर मोठा निर्णय भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना प्रवेशबंदी सीमारेषा ओलांडल्यास इतका दंड

Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, येथील बेशिस्त रिक्षा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे स्थानक परिसरात येणाऱ्या हजारो प्रवाशांना आता काही अंतर चालत जावे लागणार असले तरी, रस्ते मोकळे झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन महिन्यांपूर्वीच्या भीषण अपघातानंतर कारवाई
29 डिसेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास भांडुप पश्चिमेला एका इलेक्ट्रिक बेस्ट बसने प्रवाशांना चिरडल्याची भीषण घटना घडली होती. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होता, तर 12 हून अधिक जण जखमी झाले होते. या अपघातानंतर स्थानक परिसरातील फेरीवाले आणि रिक्षांच्या अनियंत्रित गर्दीमुळे रस्ते अरुंद झाल्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अखेर प्रशासनाने यातून धडा घेत थेट रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत रिक्षा येण्यास बंदी घातली आहे.

सीमारेषा आणि दंडाचा बडगा
वाहतूक पोलिसांनी भांडुप पश्चिमेकडील स्थानकापासून काही अंतरावर एक स्पष्ट सीमारेषा आखली आहे. या मर्यादेपुढे येणाऱ्या कोणत्याही रिक्षाचालकावर 1,500 रुपयांच्या दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यामुळे स्थानकाबाहेरील रस्ता आता वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे वर्षानुवर्षांची वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाल्याचे सांगितले आहे. मात्र, आता मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानक पश्चिम परिसरात सध्या प्रवाशांना या नवीन नियमामुळे धावपळ करावी लागत आहे.

हेही वाचा - Mumbai Local News : मुंबई CSMT स्थानकात रुळावर झोपला महाभाग! रेल्वेचा खोळंबा; व्हिडीओ पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

फेरीवाले हटले, पण 'बेस्ट'चे वळण अजूनही धोकादायक
प्रशासनाने केवळ रिक्षाच नव्हे, तर स्थानक परिसरातील शेकडो फेरीवाल्यांवरही कारवाई करून रस्ते मोकळे केले आहेत. मात्र, बेस्ट बसचे धोकादायक वळण आजही प्रवाशांच्या काळजात धडकी भरवत आहे. बस स्थानकाबाहेरील वळण घेताना आजही प्रवाशांच्या रांगेच्या अगदी जवळून फुटपाथलगत जाते. जर एखादा तांत्रिक बिघाड झाला किंवा चालकाचे नियंत्रण सुटले, तर पुन्हा डिसेंबर 2025 सारखा अनर्थ ओढवण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

फलाट क्रमांक 1 वरील प्रवाशांचा 'वनवास'
वाहतुकीचे नियोजन होत असले तरी, रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. भांडुप स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरील छताचे काम अद्याप अपूर्ण आहे. अर्ध्या फलाटावर छप्पर नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. कडाक्याच्या उन्हात प्रवाशांना छत्र्यांचा आधार घ्यावा लागत आहे किंवा ट्रेन येईपर्यंत सावलीत थांबून ऐनवेळी पळत जाऊन गाडी पकडावी लागली. यामुळे प्रवाशांनी प्रशासनाकडे छताचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - Controversial Flyover Opens: मिरा-भाईंदरकरांचा वाहतुकीचा वनवास संपणार; मेट्रोच्या 'या' डबल डेकर पुलाचा मुहूर्त ठरला; पाहा कधी होणार सुरू


सम्बन्धित सामग्री