Delhi Terrorist Attack: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाला केंद्र सरकारने दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले असून, या घटनेचा केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव मंजूर करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा ठाम संदेश देण्यात आला.
मंत्रिमंडळाचा ठराव
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वाचून दाखवलेल्या ठरावात म्हटले आहे की, '10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेला कार बॉम्बस्फोट हा भयंकर दहशतवादी हल्ला आहे. मंत्रिमंडळाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, चौकशी तात्काळ आणि व्यावसायिक पद्धतीने करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यात यावी.' या ठरावानुसार, तपास यंत्रणांना गुन्हेगार, त्यांचे साथीदार आणि कट रचणाऱ्यांना ओळखून जलदगतीने न्याय मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - Delhi Blast Update: दिल्ली स्फोटासाठी वापरला ‘दावत के लिए बिरयानी तैयार’ हा कोडवर्ड; चॅट बॉक्समधून मोठा खुलासा
पंतप्रधानांची सीसीएस बैठक
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत सीसीएस (Cabinet Committee on Security) बैठक घेतली. बैठकीनंतर मोदींनी स्पष्ट केले की, “दहशतवाद्यांचे सिंडिकेट उध्वस्त केले जाईल. तसेच देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही.” सीसीएसनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान आणि सदस्यांनी स्फोटात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि दोन मिनिटे मौन पाळले.
हेही वाचा - Bomb Threats to International Airports: देशभरात खळबळ! 'या' पाच आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
दहशतवादाविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’
मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, भारत दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भूमिकेवर ठाम आहे. दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार ओळखले जातील आणि त्यांना सोडले जाणार नाही. तथापी, त्यांनी सुरक्षा संस्थांना हल्ल्यामागील आंतरराज्य दहशतवादी मॉड्यूल शोधून काढण्यासाठी निर्देश दिले आहेत.
पाकिस्तानमध्ये खळबळ
भारताच्या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि वरिष्ठ मंत्र्यांसह तातडीची बैठक घेतली.