मुंबई: चंदेरी दुनियेतील झगमगाटामागे अनेकदा कायदेशीर वादांचा अंधार दाटलेला असतो. नुकतेच चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादवला तुरुंगवारी घडल्यानंतर, आता आणखी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. 'कहो ना प्यार है' आणि 'गदर' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अमीषा पटेल सध्या एका जुन्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद न्यायालयाने तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने तिची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे प्रकरण 2017 मधील एका इव्हेंटशी संबंधित आहे. मुरादाबाद येथील इव्हेंट मॅनेजर पवन कुमार वर्मा यांनी अमीषा पटेल आणि तिच्या सहकाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप लावला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, अमीषाला या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहायचे होते. मात्र, ती गैरहजर राहिल्याने आणि जामिनाच्या अटींचे पालन न केल्याने न्यायालयाने हे कठोर पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी अमीषाने याच न्यायालयात हजेरी लावून जामीन मिळवला होता, परंतु आता अटींचा भंग झाल्याने तिच्यावर अटकेची टांगती तलवार लटकली आहे.
हेही वाचा:Ladki Bahin Yojana: e-KYC करताना चूक झालीये? सरकारने दिली शेवटची संधी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
फिर्यादी पवन वर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 2017 मध्ये मुरादाबाद येथील एका लग्नसमारंभात हजेरी लावण्यासाठी अमीषा पटेलने तब्बल 11 लाख रुपये मानधन घेतले होते. ठरल्यानुसार ती मुंबईहून दिल्लीपर्यंत आली, मात्र तिथे पोहोचल्यावर तिने अचानक आणखी दोन लाख रुपयांची रोख मागणी केली. जेव्हा आयोजकांनी ही अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिला, तेव्हा तिने कार्यक्रमाला दांडी मारली आणि ती दिल्लीतूनच थेट मुंबईला परतली. पैसे घेऊनही फसवणूक केल्याचा आणि कार्यक्रमात न आल्याचा आरोप ठेवत वर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
दुसरीकडे, अमीषा पटेलने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली आक्रमक बाजू मांडली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिने एक सविस्तर पोस्ट लिहीत या प्रकरणावर मौन सोडले. अमीषाच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण 15 वर्षे जुने असून ते कधीच निकाली निघाले आहे. "संबंधित व्यक्तीने (पवन वर्मा) सेटलमेंट डीलवर स्वाक्षरी केली असून त्यांना त्यांची पूर्ण रक्कम परत मिळाली आहे," असा दावा तिने केला आहे. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवरून या कारवाईची माहिती मिळाल्याचे तिने नमूद केले.
केवळ स्पष्टीकरण देऊन अमीषा थांबली नाही, तर तिने फिर्यादीवरच कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. "खोटे आरोप करून आणि जुन्या निकाली लागलेल्या प्रकरणाचा आधार घेऊन प्रसिद्धी मिळवण्याचा आणि तमाशा बनवण्याचा हा प्रयत्न आहे," असे म्हणत तिने संताप व्यक्त केला. तिचे वकील आता पवन वर्मा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहेत. "मी सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत असून अशा खोट्या दाव्यांकडे दुर्लक्ष करण्यास प्राधान्य देते," अशा शब्दांत तिने सुनावले आहे.
एकीकडे न्यायालयाचा वॉरंट आणि दुसरीकडे अमीषाचा 'सेटलमेंट' झाल्याचा दावा, यामुळे हे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. खरोखरच कराराचे पालन झाले आहे की ही नवी कायदेशीर लढाई अमीषाला पुन्हा कोर्टाची पायरी चढायला लावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तूर्तास तरी, राजपाल यादवनंतर अमीषाच्या या प्रकरणामुळे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि इव्हेंट कंपन्यांमधील आर्थिक व्यवहारांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा: Dwarka Crash Victim: 'माझा मुलगा तर गेला, पण ही चूक...'; 'त्या' अपघातानंतर रील बनवणाऱ्या अल्पवयीन चालकावर मृताच्या आईचा संताप