वाहनचालकांच्या खिशाला पुन्हा कात्री; अदानी टोटल गॅसकडून CNG च्या दरात प्रति किलो ‘इतक्या’ रुपयांची वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमतीमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि पुरवठ्यातील घट यांमुळे देशांतर्गत बाजारपेठेत सीएनजीच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.
वाहनचालकांच्या खिशाला पुन्हा कात्री; अदानी टोटल गॅसकडून CNG च्या दरात प्रति किलो ‘इतक्या’ रुपयांची वाढ
CNG price hike

सध्याच्या महागाईच्या काळात वाहनचालकांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमतीमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि पुरवठ्यातील घट यांमुळे देशांतर्गत बाजारपेठेत सीएनजीच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. ‘अदानी टोटल गॅस लिमिटेड’ (ATGL) या प्रमुख कंपनीने आपल्या सीएनजीच्या दरात प्रति किलो 4.45 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या नव्या दरवाढीमुळे वाहनधारकांच्या मासिक बजेटवर मोठा ताण येणार असून, आधीच महागाईच्या फेऱ्यात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना यामुळे आणखी एक मोठा आर्थिक धक्का बसला आहे.

विविध शहरांतील सीएनजीचे नवे दर

अदानी टोटल गॅस लिमिटेडच्या (ATGL) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नवीन दरानुसार, विविध शहरांमध्ये सीएनजी आता अधिक महिनाद दराने विकावा लागणार आहे. कंपनीच्या पम्प्सवर आता अहमदाबादमध्ये सीएनजीची किंमत थेट प्रति किलो 98.47 रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय, हरियाणातील फरीदाबाद येथे सीएनजीचे दर प्रति किलो 102.60 रुपयांपर्यंत व पंजाबमधील जालंधर येथे प्रति किलो 100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या शहरांमध्ये सीएनजीच्या दराने शंभरीपार मजल मारल्यामुळे खासगी वाहनचालक, टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांची चिंता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

एलएनजीच्या किमतीत तिप्पट वाढ

सीएनजीच्या किमतीत अचानक एवढी मोठी वाढ का करावी लागली, याचे स्पष्टीकरण देताना कंपनीने आंतरराष्ट्रीय घडामोडींना जबाबदार धरले आहे. कंपनीच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) च्या ‘स्पॉट’ किमती 10 ते 12 डॉलर्स प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट्सवरून थेट वाढून तब्बल 30 डॉलर्सपर्यंत पोहोचल्या आहेत. या प्रचंड दरवाढीमुळे परदेशातून गॅस आयात करण्याचा खर्च कैक पटीने वाढला आहे. परिणामी, कंपनीला हा आर्थिक भार ग्राहकांवर टाकणे भाग पडले आहे.

हेही वाचा – ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवा नियम; किती टक्के गुण मिळवावे लागणार?

देशांतर्गत गॅस पुरवठ्यात घट

केवळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठच नव्हे, तर देशांतर्गत पातळीवरही गॅसच्या उपलब्धतेत मोठी घट झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून मिळणाऱ्या ‘न्यू वेल गॅस’ (NWG) चा पुरवठा आकुंचित झाला असून, सरकारी निर्देशानुसार ‘हाय-प्रेशर, हाय-टेम्परेचर’ (HPHT) क्षेत्रांतून होणारा पुरवठाही कमी झाला आहे. स्वस्त गॅसची ही तूट भरून काढण्यासाठी कंपनीला महागड्या पर्यायी स्रोतांकडून गॅस खरेदी करावा लागत आहे. ग्राहकांना अखंडित पुरवठा मिळवून देण्यासाठी हा निर्णय नाईिलाजास्तव घ्यावा लागला, असे कंपनीने म्हटले आहे. या दरवाढीनंतर आता आगामी काळात इतर ऊर्जा कंपन्यांकडूनही सीएनजी आणि इतर इंधनांच्या किमतीत वाढ केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version