दार्जिलिंग : उत्तर बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. दार्जिलिंगमधील मिरिक आणि सुखिया पोखरी या भागात भूस्खलनामुळे (Landslide) अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दुधिया येथील बालसन नदीवर बांधलेला लोखंडी पूलही कोसळला आहे. 17 जणांचे मृतदेह सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे दार्जिलिंग जिल्हा पोलिस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. याचा परिणाम म्हणून बंगाल आणि सिक्कीममधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवरून पोस्ट करत या प्रकरणी संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि सर्व पीडितांना शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
7 मृतदेह बाहेर काढले; बचाव कार्य सुरू
दार्जिलिंग जिल्हा पोलिसांचे कुर्सियांगचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी सांगितले की, "ढिगाऱ्यातून 7 मृतदेह आधीच बाहेर काढण्यात आले आहेत. आम्हाला आणखी दोन लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे." त्यांनी रस्त्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली. दार्जिलिंगला जाणारा कुर्सियांग रोडवरील दिलाराम येथे भूस्खलन झाल्यामुळे तो रस्ता बंद आहे. तसेच, गौरीशंकर येथील भूस्खलनामुळे रोहिणी रोडही बंद झाला आहे. तिनधारिया रोड सध्या सुरू असून, त्या मार्गाने तीन ते चार तासांत सर्व पर्यटकांना मिरिकमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पोलिसांनी मदतीसाठी हॉटलाईन जारी केली आहे. घटनास्थळी अडकलेल्या लोकांनी 9147889078 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
ममता बॅनर्जी भेट देणार, खासदार राजू बिस्तांकडून मदतीचे आवाहन
उद्या घटनास्थळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि दार्जिलिंगचे खासदार राजू बिस्ता यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले की, "दार्जिलिंग आणि कलिम्पोंग जिल्ह्यांच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळाल्यावर मला दुःख झाले. या दुर्घटनेत मृत्यू झाले आहेत, मालमत्तेचे नुकसान झाले आहे आणि पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. मी परिस्थितीचा आढावा घेत असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे." त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना लोकांना मदत करण्यासाठी एकत्र येण्याचे निर्देश दिले असून, सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना गरजूंपर्यंत वेळेवर मदत पोहोचवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे.
पर्यटन स्थळे आणि टॉय ट्रेन सेवा बंद
भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या धोक्यामुळे गोरखालँड क्षेत्रीय प्रशासनाने (GTA) मोठा निर्णय घेतला आहे. दार्जिलिंगमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, जसे की टायगर हिल आणि रॉक गार्डन त्वरित बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दार्जिलिंगची ओळख असलेली टॉय ट्रेन सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे. अनेक सखल भागांत पाण्याची पातळी NH-10 च्या वर पोहोचली आहे.
हवामान विभागाचा अलर्ट
हवामान विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा (Alert) जारी केला आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत बीरभूमसह काही जिल्ह्यांत 7 ते 20 सेंटीमीटरपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर बंगालच्या डोंगराळ भागात पावसाची संततधार सुरू आहे.