राजधीन दिल्लीतून एक हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे. नवी दिल्लीतील सीमापुरी या भागात बुधवारी दुपारी चार मजली इमारत अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. काही क्षणातच संपूर्ण इमारत ही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे रस्त्यावर जमीनदोस्त झाली आणि मोठा धुरळा उडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
क्षणात होत्याचं नव्हतं
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 12 वर्षीय मुलगी, चार महिन्यांची गरोदर असलेली 21 वर्षीय गुलफससा आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर संपू्र्ण परिसरात एकच आक्रोश आणि धावपळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशनम दलाच्या चार गाड्या, पोलीस, एडीआरएफ सह आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
ढिगाऱ्या खालून आतापर्यंत 11 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. जखमींमध्ये मोमीन मिर्झा (56) आणि 3 वर्षांचा अब्दान, अब्दुल रहमान (28), देवरुद्दीन (28), सलमा (50), छोटे (34), सकीना (35) आणि समद (30) यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धक्कादायक म्हणजे दिल्लीमधील एका महिन्यातील ही दुसरी मोठी इमारत दु्र्घटना आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण दिल्लीमधील सत्य निकेतन भागात पाच मजली पीजी इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता.