प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत मोठी वाढ; न्यायालयाने थेट घरावर…

दिल्लीच्या साकेत न्यायालयाने त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात बजावलेले समन्स थेट त्याच्या गुरुग्राम येथील घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चिकटवले आहे.
प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत मोठी वाढ; न्यायालयाने थेट घरावर…
Dhruv Rathee

आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओंमुळे सतत चर्चेत राहणारा प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी याच्या कायदेशीर अडचणींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात बजावलेले समन्स थेट त्याच्या गुरुग्राम येथील घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चिकटवले आहे. गुरुग्राममधील सेक्टर 56 येथील ‘केंद्रीय विहार’ सोसायटीत ध्रुवचे निवासस्थान आहे. भाजप आयटी सेलचे कार्यकर्ते विकास सांस्कृत्यायन उर्फ विकास पांडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून न्यायालयाने ही कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणाची पुढील महत्त्वपूर्ण सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

2018 मधील वादग्रस्त व्हिडिओ

दरम्यान, या प्रकरणाचा संबंध 2018 मध्ये ध्रुव राठीने यूट्यूबवर पोस्ट केलेल्या ‘BJP IT Cell Part-2’ या व्हिडिओशी आहे. या व्हिडिओमध्ये भाजपच्या आयटी सेलवर आणि वैयक्तिक माझ्यावर अत्यंत गंभीर व बिनबुडाचे आरोप करण्यात आले होते, असा दावा तक्रारदार विकास पांडे यांनी केला आहे. महावीर प्रसाद नावाच्या एका व्यक्तीला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आणि ध्रुव राठीची बदनामी करण्यासाठी 50 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा उल्लेख या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता. हे सर्व आरोप पूर्णपणे असत्य असून यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाल्याचा दावा करत पांडे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

परदेशात वास्तव्यामुळे कारवाईस विलंब

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात जुलै 2019 मध्येच न्यायालयाने प्रथम समन्स जारी केले होते. मात्र, ध्रुव राठी हा दीर्घकाळ ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असल्याने आणि त्याच्या प्रतिनिधींकडून नोटिसा स्वीकारल्या जात नसल्याने या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. आता ध्रुव राठी भारतात परतला असून तो दिल्ली-एनसीआर परिसरात असल्याची माहिती समोर आल्यानंतर, साकेत न्यायालयाने तक्रारदाराच्या विनंतीवरून न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत थेट त्याच्या घरावर समन्स चिकटवण्याची परवानगी दिली.

हेही वाचा – SIR वरून राजकीय घमासान सुरूच! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 2027च्या निवडणुकांपूर्वी…

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने (CJP) दिल्लीतील सेंट्रल पार्क येथे आयोजित केलेल्या ‘तिरंगा मार्च’ आंदोलनात ध्रुव राठी सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगल्या आहेत. याच काळात न्यायालयाने त्याच्या घरावर समन्स बजावल्याने या विषयाला मोठे वळण मिळाले आहे. आता 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीत साकेत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version