दिवाळीचा सण तोंडावर आला की पुणेकरांचे वेध लागतात ते गावाकडच्या दिवाळीकडे. पण याच दिवसात रेल्वेला वेटिंग शिवाय खासगी बसचे तिकीट दर थेट गगनाला भिडले असतात, त्यामुळे गावी जाणाऱ्या सामान्य प्रवाशांचे मोठे हाल होतात. हीच गर्दी आणि लूट लक्षात घेता पुणे एसटी विभागाने आता प्रवाशांना मोठा दिलासा दिलेला आहे.
खासगी बसच्या वाढत्या दरांना पर्याय
यंदाच्या दिवाळीमध्ये पुणे विभागातून तब्बल 1 हजार 200 इतक्या विशेष जादा बसेस या प्रवाशांसाठी सोडण्यात येणार आहेत. याबाबतची सर्व माहिती विभागीय रुण सिया यांनी दिलेली आहे.
कोणत्या तारखेपासून बससेवा सुरू?
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व जादा बसेस 4 ते 7 नोव्हेंबर या चार दिवसांत धावणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. यामधील 900 बसेस या पुण्यातून विदर्भ, मराठवाडा शिवाय खान्देशसाठी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या विशेष बसेस पिंपरी-चिंचवड या आगारातून सोडल्या जाणार आहेत. यापूर्वी पाहिलं तर या भागातील बसेस खडकी कॅन्टोन्मेंटमधून सुटल्या जायच्या, पण असंख्य प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीमुळे आता या बसेसे मेट्र्रो कनेक्टिव्हिटी असलेल्या पिंपरी-चिंचवड येथून सुटतील.
जाणून घ्या मार्ग
उर्वरित 300 बसेस या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी असणार आहे. ज्या स्वारगेट आणि शिवाजीनगरसह वाकडेवाडी येथून धावतील, अशी माहिती आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या मार्गावर विशेष बसेसचा जास्त भार असणार आहे. विशेष म्हणजे, या दिवसात नियमित असलेल्या बसेस ही सुरुच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विखुरण्यास मदत होईल. गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी वेळेआधीच ऑनलाइन आरक्षण करुन घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केलेले आहे.