Sudan Drone Attack: उत्तर आफ्रिकेतील सुदान देशातील संघर्ष पुन्हा एकदा भीषण स्वरूपात समोर आला आहे. देशातील निमलष्करी गट रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांनी दक्षिण कोर्डोफान राज्यातील कालोगी शहरातील एका बालवाडीवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 33 मुलांसह किमान 50 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, घटनास्थळी पोहोचलेल्या पॅरामेडिक दलालाही दुसऱ्या अचानक हल्ल्याचे लक्ष्य बनवण्यात आले.
दळणवळण ठप्प, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
ड्रोन हल्ल्यानंतर परिसरातील संपर्कयंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, मृतांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा आकडा आणखी वाढू शकतो. दोन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या RSF आणि सुदानी सैन्यादरम्यानच्या संघर्षाची ही नवीन आणि अत्यंत भीषण परिणती मानली जात आहे.
युनिसेफचा संताप
या क्रूर हल्ल्यानंतर मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या युनिसेफने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. 'शाळेत मुलांची हत्या ही मानवतेला कलंकित करणारी घटना आहे. युद्धाची किंमत मुलांना कधीच चुकवावी लागू नये,' असे युनिसेफ सुदानचे प्रतिनिधी शेल्डन येट यांनी म्हटले. त्यांनी तत्काळ हल्ले थांबवण्याचे आणि मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.
शेकडो नागरिकांनी गमावला जीव
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये कॉर्डोफानमधील विविध भागांत शेकडो नागरिक ठार झाले आहेत. दारफूरमध्ये सुरु असलेली लढाई आता अल-फाशेर शहरावर RSFने कब्जा केल्यानंतर कोर्डोफानकडे वळली आहे. गेल्या रविवारीही कौदा येथे सुदानी सैन्याच्या हवाई हल्ल्यात 48 जणांचा बळी गेला, ज्यात बहुतेक नागरिक होते. वाढता हिंसाचार लक्षात घेता यूएनच्या मानवाधिकार विभागाने गंभीर इशारा दिला आहे की अल-फाशेरमध्ये झालेले अत्याचार आता कोर्डोफानमध्येही पसरू शकतात.
2023 पासून सत्तासंघर्षात 40,000 हून अधिक मृत
तथापी, RSF आणि सुदानी सैन्य यांच्यातील संघर्ष एप्रिल 2023 पासून उफाळलेला असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार आतापर्यंत 40,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मदत संस्थांचे म्हणणे आहे की प्रत्यक्ष आकडे सरकारी नोंदींपेक्षा अनेक पटींनी जास्त असू शकतात. सुदानमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भीषण होत असून, विशेषत: मुलांवर आणि नागरिकांवर होत असलेल्या थेट हल्ल्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायात प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.