70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच समता सैनिक दलाच्या सैनिकांकडून शिस्तबद्ध परेड काढण्यात आली. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना नाशिक कुंभमेळ्याचे निमंत्रण देणार आहेत. या भेटीत कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार - भगवतीपूर परिसरातील शिवप्रेमींची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी हजारो शिवभक्तांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.
पहूरमध्ये डंपरचालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे! भरधाव डंपरने मारुती स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कार तब्बल 10 ते 15 फूट पुढे फरपटत गेल्याचा आरोप आहे. जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यासाठी रात्रीपासूनच मोठ्या संख्येने मुंडे समर्थक दाखल झाले आहेत. उत्साह मोठ्या प्रमाणात आहे पंकजाताई काय बोलतील याची उत्सुकता ही आहे. मुंडे साहेबांपासूनची ही परंपरा आहे ताई साहेब पुढे घेऊन जात आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई चांगला संकल्प करतील अशा प्रतिक्रिया मुंडे समर्थकांनी व्यक्त केल्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन केल्यानंतर स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलनात सहभाग घेतला. शहरातील अभिनव विद्यालयातून या पथसंचलनाला सुरुवात झाली, तर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ पथसंचलनाची सांगता करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये, तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांतून एसआयआर, पूर्णेकर हत्या प्रकरण आणि राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना नेमका काय संदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांचा भगवानगडावर, तर मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे या सर्व मेळाव्यांतील भाषणांकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विजयादशमी भाषणातून संघाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. जगभरातील जेन-झी आंदोलने, तरुणांमधील असंतोष, बेरोजगारी, महागाई आणि बदलती सामाजिक परिस्थिती यावर भागवत काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता, तरुणांचा सहभाग आणि संघाच्या आगामी कार्यावरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, इस्रायलचे मुंबईतील कॉन्सुल जनरल यानिव रेवाच आणि दैनिक जागरणचे ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता उपस्थित आहेत.
मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथून सध्या दसरा मेळाव्याची मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यातून कोणती भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांचाही दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्क आणि नेस्को सेंटरवरील या दोन्ही मेळाव्यांतून नेते कोणते राजकीय मुद्दे मांडणार, कार्यकर्त्यांना काय संदेश देणार आणि ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाला कोणते वळण मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण सुरू झाले आहे. यावेळी महानगर संघचालक राजेश लोहिया आणि दैनिक जागरणचे संपादक संजय गुप्ता यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते. उत्सवादरम्यान संघाच्या स्वयंसेवकांनी कवायत सादर केली, तर घोष पथसंचलनाचे अवलोकन मंचावरील पाहुण्यांनी केले.
जळगावात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दुर्गादौडीचा आज विजयादशमीच्या दिवशी ठिकठिकाणी फुलांची उधळण करत उत्साहात स्वागत करण्यात आलं. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून या दुर्गादौडीचं आयोजन करण्यात येतं. आजच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची आठवण व्हावी, तसेच तरुणांमध्ये धर्मकार्याची प्रेरणा निर्माण व्हावी, हा या दुर्गादौडीमागील मुख्य उद्देश आहे.
विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दैनिक जागरणचे संपादक संजय गुप्ता यांचे भाषण झाल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत देशाला संबोधित करणार आहेत.
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात उपस्थित. गेल्या काही दिवसांपासून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्यारे खान विरोधात भूमिका घेत आहेत. प्यारे खान यांची संघ स्थानी उपस्थिती संघ परिवारात चर्चेचा विषय. माहितीनुसार संघाच्या निमंत्रणावरून प्यारे खान विजयादशमी सोहळ्यात उपस्थित